Saturday, 12 April 2014

"शब्देवीन संवादू"


"शब्देवीन संवादू"

ऐकले जे गुज दुजियाचे मुखी,

दुजा सांगे तिज्या आठवे जो विचार

सांगू जाता तिजा चौथ्याशी,

गुज ती वाणी होय विपरीत…!

दाहीमुखी पसरता मुळ तो विचार

कोठे होय लुप्त नकळे पामरा,

म्हणोनिया ऐकावे मुळ त्या विचारा

सांगावांगीवरी विश्वास नोहे बरा…!


          आपण समाजामध्ये वावरत असतांना कांही गोष्टी आपण ऐकण्यामध्ये, समजण्यामध्ये गल्लत करीत असतो या गल्लतीमुळे मोठा घोटाळा निर्माण होतो ज्यामुळे अर्थाचा अनर्थ होवून तो मोठ्या संकटाची नांदी ठरू शकतो. पेशवेकालीन इतिहासामध्ये "ध चा मा" केल्यामुळे किती अरिष्ट ओढवले गेले हा इतिहास सर्वज्ञात आहे. "ध चा मा" करणारा अत्यंत धुर्त असतो! अंमलबजावणी करणाऱ्याचे कच्चे दुवे त्याला पुरेपूर माहित असतात, नव्हे तर तो कच्चे दुवे शोधण्यात चतुर असतो. त्या दुव्याचा स्वहित साधण्यासाठी वापर करून घेण्याइतपत तो चाणाक्ष असतो! आपले इप्सित साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. त्याचा कावा ओळखता आला तर माणसंच काय जगही जिंकण सोप जाईल…! परंतु नाही तसं घडत नसतं. कारण त्याने पसरलेल्या मायाजालाच सामर्थ्य एवढ जबरदस्त असतं की भलेभले महामानव, ऋषिमुनीही हतबल ठरतात! मग सर्वसामान्यांची गत ती काय असणार, एक प्रकारचं अंधत्व हे मायाजाल निर्माण करत असतं. या मायाजालातून बाहेर पडणारा विरळाच! महाभारतात सर्वज्ञ लक्ष्मणाला माहिती असतं की सुवर्णमृग हा एक मायावी राक्षस आहे तरीही सीतेच्या दुराग्रहापुढे लक्ष्मणाचा नाईलाज होतो. मारीचाच्या मायावी रूपास सीता भूलते त्याच्या प्राप्तिसाठी लक्ष्मणाकडे दुराग्रहाने अट्टहास करते, लक्ष्मण वास्तव समजावून सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करतो पण मायाजालाच्या विलक्षण प्रभावामुळे सीता कांहीही ऐकायला तयार नसते. त्यातून घडलेले रामायण, झालेला संहार सर्वश्रूत आहेच…! परंतु त्यापासून आम्ही धडा घेत नाही यापेक्षा मोठा दैवदुर्विलास आणखी कोणता असू शकतो?

          आजही विसंवादाचं विषारी तन फारच माजलय…! उभ्या पिकाची ते हां हां म्हणता नासाडी करत सुटलय! बहरात आलेले पीक डोळ्यादेखत जळताना, अवर्षणात होरपळताना, गारपिटीत झोडपून नष्ट होताना पाहून होणारं दु:ख किती जीवघेणे असते हे पीक बहरावे म्हणून हाडांची काडं करत रक्ताचं पाणी करून घाम गाळणा-या शेतकऱ्यांशिवाय इतरांना नाही कळायचे! दु:खातिरेकाने एक तर ह्रदय विकाराने जीव गमावण्याची वेळ येते नाही तर गळफास लावून आत्महत्या करण्याची पाळी येते…! म्हणून हे माजलेले तणकट  कमी करण्याचा अल्पसा तरी प्रयत्न करावा म्हणून हा लेखन प्रपंच…

        शासन विकासासाठी निरनिराळे कायदे करतं, शासन निर्णय काढून विकसाच्या योजना आखतं आणि यंत्रणांकडे राबविण्यासाठी सुपुर्द करतं. भोळ्याभाबड्या जनतेला वाटतं विकास आपल्या दारातच येवून ठेपला! पण दुर्दैवाने तो भाबडेपणाच ठरतो. इतकाही भाबडेपणा नसावा हा भाबडेपणा अंगी बाळगण हाही एक प्रकारचा गुन्हाच ठरतो. कायद्याचे ज्ञान नाही या सबबी खाली अज्ञानाच समर्थन करताच येत नाही. सत्य जाणून घेणे, कायद्याची माहिती जागरूकतेने करुन घेणे ही जबाबदारी आपली प्रत्येकाचीच असते. विविध प्रसारमाध्यमे, "माहितीचा अधिकार" यासारखे कायदे आपल्या मदतीसाठी तत्पर असतात हेही नाकरता येत नसते. "साप साप म्हणत भुई धोपटनं" केंव्हाही चुकीचच असतं. काठी मोडून जाते भुईला फारशी इजा होत नसते, साप मात्र निघून जातो म्हणून सत्यासत्य जाणून घेतले तर दुर्दशा टळू शकते. अन्यथा वाताहात ही अटळ ठरते. कायद्याचा, शासननिर्णयाचा अर्थ हा आपले वैयक्तिक हीत, स्वार्थ जपण्यासाठी कांही धुर्त मंडळी स्वअर्थ काढून स्वार्थ साधत विकासाला हमरस्त्याने पळवतात, गल्लीबोळात फिरवतात की रानोमाळ पसरवतात हे सर्वसामान्यांच्या आकलना बाहेरचे असते…! विकास तर दृष्टीस दिसत नाही मात्र विकास झाल्याचा डांगोरा पिटला जातो. परिणामी भ्रष्टाचाराचे आरोपप्रत्यारोप होत रहातात, मोठमोठ्या चळवळी उभारल्या जातात, आंदोलने केली जातात  समाजात हे विसंवादाचं भूत थैमान घालत असतं… त्यासाठी संवाद हा सुसंवादी व्हायला हवा. त्यासाठी संवादकौशल्य हवं असतं. आपण काय बोलतो, कशा पद्धतिने बोलतो ते समोरच्याला समजले की नाही याचं आकलन व्हायला हवं. तद्वतच समोरचा काय आणि कुठल्या हेतूने बोलतोय, त्याचा हेतू काय आहे तो शुद्ध आहे काय? हे समजून घेता आलं पाहिजे, ते समजले तर गुंता होणारच नाही.

           स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या प्रशिक्षणवर्गावर प्रशिक्षक म्हणून मला पाचारण केले जाते. संवादकौशल्य हा माझा आवडीचा विषय म्हणून प्रशिक्षणार्थ्यांना विसंवादामुळे अर्थाचा सोयीस्कर गैरअर्थ कसा काढला जातो, त्यामुळे अनर्थ कसा ओढवला जातो हे पटवून देण्यासाठी आम्ही खेळ खेळायचो, मी एका को-या कागदावर संदेश लिहून काढायचो मग एका प्रशिक्षणार्थ्याला व्यासपीठावर बोलावून घ्यायचो, त्याला तो संदेश मनातल्यामनात वाचायला लावायचो. त्याच्या पुर्णपणे लक्षात राहील, त्याचं समाधान होईल तितका वेळ त्याला वाचू द्यायचे. तो ज्यावेळी म्हणेल, "सर आता माझ्या लक्षात आले." त्यानंतरच दुसऱ्या प्रशिक्षणार्थ्याला व्यासपीठावर बोलावून पहिल्याला तो संदेश फक्त दुसऱ्यालाच ऐकू जाईल अशा रितीने कानात सांगायला लावायचा. याचपद्धतीने तो संदेश दुसऱ्याकडून तिस-याकडे, तिस-याकडून चौथ्याकडे, चौथ्याकडून पाचव्याकडे कर्णोपकर्णी देत रहायचा. मग शेवटच्या सहभागी प्रशिक्षणार्थ्याला काय संदेश मिळाला ते विचारायचे आणि पहायचे काय मजेशीर आणि गमतीदार उत्तर ऐकायला मिळतं ते. संदेशाच्या किती विपरीत येते याचे एक गम्मतशीर उदाहरण पहा… मी जाणीवपूर्वक व्यवहारातील संदेश लिहून द्यायचो तो असा असायचा, "घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी घरातील महिलांचा विचार घेवूनच बांधकामाचा आराखडा तयार करावा." हा संदेश वरीलप्रमाणे कर्णोपकर्णी फिरवायचा शेवटी पहायचे त्या संदेशाचं उत्तर शेवटच्या विशेषतः महिला सहभागी कडून काय ऐकायला मिळायचं ते विसंवादाचा किती भयानक परिणाम होतो याचं उत्तम, डोळ्यात अंजन घालणारं आहे, उत्तर ऐकायला मिळाले ते असे होते, "घराचं बांधकाम झालं आहे, तुम्ही आता काय करायचं ते करा!" यापेक्षा विसंवादाच्या भयानक परिणामाचे उदाहरण आणखी कोणतं असू शकते? अशा अंमलबजावणी करणाऱ्या प्रतिनिधींच्या मग ते प्रशासनातील असोत वा प्रशासनाबाहेरील त्यांच्या हाती विकास योजना पडल्यावर विकास योजनांचं काय फलीत मिळंत असेल ते सुज्ञास सांगणे नलगे…! शासकीय योजनांची अंमलबजावणी करते वेळी त्याची प्रचिती आल्यावाचुन रहात नाही.  शासन विकासाच्या निरनिराळ्या योजना आखतं आणि  अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुकास्तरावर जबाबदारी टाकतं. तालुकास्तरावरून योजना राबविण्यासाठी गावपातळीच्या कर्मचारी, आधिकारी, पदाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात येते. कर्मचार्‍यांच्या निवडीसाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. अशी किमान शैक्षणिक अहर्ता पदावर निवडीसाठी पुरेशी असली तरी "व्यक्ति तितक्या प्रकृती" या तत्वानुसार प्रत्येकाचीच बौद्धिकपातळी, आकलनशक्ति, समज ही परिपक्व, प्रगल्भ असेलच असे नाही. तद्वतच गावपातळीवरही लोकशाही शासन पद्धतिनुसार "लोकप्रतिनिधी" निवडुन देण्यासाठी शैक्षिणक अहर्ता आवश्यक नाही! आणि आजकाल तर फक्त आणि फक्त निवडुन येण्याची क्षमता असावी हेच एकमेव ग्रहितक महत्वपूर्ण ठरलं जाऊ लागले आहे…! मात्र त्यासाठी ज्या पात्रता ठरल्या जात आहेत त्या आकलनशक्तिच्या पलीकडच्या आहेत… उमेदवाराकडे भरपूर पैसा हवा मग तो कोणत्याही मार्गाने कमवलेला  असला (अर्थात गुन्हेगारी मार्गाने सुद्धा!) तरी चालतो, पक्षांतर करून नव्याने पक्षात प्रवेश केलेला असला तरी हरकत नसते, तो विशिष्ठ जाती/धर्म/ पंथामध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व प्रस्थापित करू शकणारा असावा, निवडणुकीत एकतर दहशत निर्माण करून अथवा प्रलोभन दाखवून निवडुन येणारा असावा! कारण सर्वसामान्य जनता एकतर लोभी प्रवृत्तीमुळे विकली जावू शकते किंवा ती भित्रीतरी असते ही मानसिकता ओळखली गेलेली असते म्हणून या पात्रते अधारे निवडुन आलेल्या उमेदवारांच्या अधारे बहुमत सिद्ध करता येते मग सत्ता हातातून जाण्याची भितीच रहात नाही! असे लोकप्रतिनिधी आणि अपरिपक्व कर्मचारी यांच्या हाती योजना पडल्यावर त्या अक्षरशः पडणारच! योजनांच्या हेतूमधे शंका निर्माण करण्यासाठी ही मंडळी कारणीभूत ठरत असते. इथेही विसंवादाचे तत्व काम करीत असते. अपरिपक्वतेमुळे, प्रगल्भतेअभावी गावपातळीवरील कर्मचारी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना योजनांचा हेतू समजाऊन देण्यामध्ये एकतर असमर्थ ठरतात किंवा आपमतलबी धोरणामुळे हेतु दडवलेला असतो. ज्यांच्यासाठी योजना आखलेल्या असतात त्यांना तो स्पष्ट समजावून दिला जात नाही,  त्यामुळे संद्ग्धिता व संभ्रम निर्माण होतो, विश्वासपात्रता गमावली जाते. आरोपप्रत्यारोप होवू लागतात, योजना रखडल्या जातात,  भ्रष्टाचार फोफावला जातो…!  विकास हा शब्दच फसवा ठरतो, याचे खापर शासनप्रणालीवर फोडले जाते. ते फोडण्यासाठी "जागरूक" मंडळी टपुनच बसलेली असते त्यांच्या हाती आयते "कोलीत" मिळते. म्हणून लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी सुद्धा किमान शैक्षणिक पात्रतेसह त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, जाण,  निसंदिग्ध चारित्र्य किमान यातरी अटी आवश्यक वाटु लागल्या आहेत. मतदारांनीही निवड्णुकीच्यावेळी कुठल्याही प्रलोभणाला बळी न जाता मतदानाच्यावेळी सद्सद्विवेक जागृत ठेऊन मतदान केलेतर निश्चितच पात्र उमेदवार लोकप्रतिंनिधीत्व करतील.  या पात्रतेचे उमेदवार जर लोकप्रतींनिधी म्हणून निवडून सत्तेमध्ये गेले तर लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संदेह,  अविश्वास राहणार नाही. विसंवादाला तोंड फुटून अराजकता निर्माण होणार नाही, लोकशाहीला बाधा पोहचणार नाही. योजना यशस्वीपणे राबवल्या जातील आणि खराखुरा विकास साधेल यात शंका बाळगण्याचे कारणच राहणार नाही.
     यासाठी संवाद हा विसंवादात परिवर्तित होवू देण नाही परवडणार! त्यासाठी "शब्देवीन संवादू" साधायला शिकता आलं पाहिजे. ते साधता आलं तर नांदेल सूखसमृद्धीचं साम्राज्य, आनंदाचे रामराज्य  दारोदारी…!

Thursday, 27 February 2014

लोकशाही अशीही...!


      
लोकशाही अशीही …! आणि तशीही …!


   भारतमाता ज्ञात अज्ञात असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या निस्वार्थ त्याग, बलीदानामुळे पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झाली. भारतमातेच्या लेकरांनी सुटकेचा श्वास सोडला… त्यांना वाटलं असेल आता आपण मुक्त झालो, आता काय आपलंच राज्य! आपल्या स्वप्नातल्या राज्याची संकल्पना साक्षात अवतरावी या भावनेतून लोकशाही शासन व्यवस्था स्विकारली ती एका आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्याचं  स्वप्न पहात!  महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून पाहिलेले स्वप्न, स्वप्नही किती साधसुधं होतं, "लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य." आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणजे आपणच… मग आपल्या हिताचा, आपल्या विकासाचा मार्ग आपल्याच हातात! किती भाबडं आणि सालस स्वप्न होतं नाही? स्वप्नातला भारत, स्वप्नातील स्वातंत्र्य जणू आता पुढ्यात आलं! असं पारतंत्र्यात पिचलेल्या जनतेला, जीवाचं रान करंत सर्वस्वाची आहूती देणा-या, हसंतहसंत वंदेमातरमची गर्जना करंत फासावर लटकणा-या स्वातंत्र्यवीरांच्या आत्म्यांनाही वाटलं असणार…. आजचे वर्तमान जेंव्हा वर्तमानपत्रातून वाचतो, दुरदर्शनवर बघतो, परिसरात वावरताना पहातो तेंव्हा वाटतं कुठे ते स्वप्न आणि कुठे हे वास्तव! आम्ही शाळेत असतांना वक्तृत्वस्पर्धा घेतल्या जायच्या "विज्ञान शाप की वरदान", "शक्ति श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ" त्यावेळी आम्ही आगदी तावातावाने आपापली मते ठासून मांडत असू, प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती शोधंत असू! हे आठवलं की गंमत वाटते. आज लोकशाही चालविण्यासाठी हिरिरीने सरसावणारे राजकीय पक्ष जेंव्हा एकमेकांविरुद्ध जणूकांही दंड ठोकून उभे आहेत, परस्परांची उणिदुणी काढून एकमेकांना पाण्यात पहात आहेत. प्रतिपक्ष किती चुक आहे, आम्ही किती निष्कलंक आणि स्वच्छ आहोत हे ठासून सांगतांना आपण आपल्या सारासार विचारांना तिलांजलि देत आहोत याचंही भान सोडतो आहोत याच तारतम्य बाळगायचाही विसर पडावा? बरं ही भावना इतर पक्षाविरोधापर्यंत समजू शकेल पण पक्षांतर्गतही संदोपसंदी चाललेली सर्वसामान्यांच्या नजरेत भरण्या इतपत चालू आहे! विज्ञान शाप की वरदान ऐवजी, लोकशाही शाप की वरदान ही स्पर्धा सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे, प्रतिस्पर्ध्याचे शक्तिहरण करण्यासाठीच युक्ती पणाला लावली जात आहे की काय याचीच शंका यावी!  
           पक्षाच्या हितापेक्षाही देशाचे हीत, सर्वसामान्यांचे हीत, लोकशाहीचे हीत सर्वोच्च आहे ही   सद्विवेकी सद्भावना सर्व पक्षियांनी बाळगून प्रतिपक्ष किती चुकीचा आहे हे सांगण्यात शक्ती पणाला लावत बसण्यापेक्षा आपण आपली ढासळंत चाललेली प्रतिमा उजळून निघण्यासाठी, देशाचे भवितव्य राखण्यासाठी, लोकशाहीला उर्जित अवस्थेला नेण्यासाठी आपण काय कार्यक्रम आखला आहे? कुठले धोरण अवलंबिले जाणार आहे? कुठल्या उपाययोजना राबवणार आहोत? त्याची सद्यस्थितीत किती गरज आहे? यावर जर भर दिला तर त्याचा निश्चित लाभ झाल्याशिवाय रहाणार नाही. आपण प्रतिपक्षापेक्षाही किती स्वच्छ आणि निरपेक्ष आहोत हे दाखवण्यासाठी, सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी अवाजवी नैतिकतेच्या दंभाचं प्रदर्शन करीत खोटेनाटे, बिनबुडाचे आरोप करने, ते किती नालायक आहेत आपण किती लायक आहोत हे घसा कोरडा करून ओरडून सांगत बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करने हा जणूकांही आज प्रघातच बनत चालला आहे. संसदेतल्या कामकाजाच थेट प्रक्षेपण करण्याची पद्धत सुरू झाल्यापासून झाकली मुठ उघडलेली आहे! थेट संसदेमधे गदारोळ कसा घातला जातो, "हातघाई" कशी चालते, हाणामारीपर्यंत ती किती लिलया पोहचते…! हे "याची देही याची डोळा" पहाण्याचे दुर्भाग्य नशिबी यावं! हा दैवदुर्विलास कमी पडलाकी काय म्हणून भर संसदेत हौद्यात उतरने, अश्लाघ्य गोंधळ घालणे, सन्माननीय सभापतिंच्या समोर आरडाओरडा करत अशोभनिय हातवारे करने, राजदंड पळवने, माईक तोडने, उच्चपदस्थ अधिका-याला "लोकप्रतिनिधी" म्हणवण्या-यांनी धक्काबुक्की करत सांसदीय कामकाजाचे दस्तावेज "टर्रर्रकावत उधळून द्यावे…? अंगावरील कपडे काढून अर्धनग्न होत निदर्शन करने, संसदभवनालाच आखाड्याचं मैदान समजून फ्रीस्टाइल कुस्ती खेळने यापेक्षा लाजिरवाणी, नैतिकतेच्या अध:पतनाची आणखी कोणती उदाहरणे असू शकतील…? यापेक्षा संसदेच्या मर्यादाचे उल्लंघन आणखी कोणतेही असू शकत नाही. दुरदर्शनवरच वार्तांकन पहातांना "कालचा गोंधळ बरा व्हता" म्हणण्याची वेळ दररोज यावी…? याला लोकशाहीची क्रूर थट्टा म्हणण्याशिवाय दुस-या कोणत्या शब्दाने संबोधावे? गाडी चालवायला शिकणं फार सोप असतं पण तिच्यावर नियंत्रण करायला शिकण्यासाठी खर कसब लागतं. ते नियंत्रण आज लोकप्रतिनिधींच्या हातून सुटतांना दिसतय! नियंत्रण सुटलेकी अपघात होणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज कशाला?  "काळकामवेगाचं" गणित फक्त अभ्यासासाठी नाही तर ते जिवनातील प्रत्येक कृतिमध्ये अंगिकारता यावे लागते. आणि ते गणित सोडवता आले तर त्याला पराजयाचा सामना करण्याची गरजच पडणार नाही…! पण इथेच तर आम्ही गडबडतो! आम्ही बेभान, बेताल होतो आणि विसरून जातो की आम्हास ज्या जनतेने त्यांचे प्रतिनिधि म्हणून निवडून दिले त्यांचेच प्रतिनिधित्व आपण करतो आहोत, जनता आपल्या प्रत्येक कृतिकडे  आशादायी विश्वासाने लक्ष ठेवून असते. त्यांचा आपण अपेक्षाभंग करतो आहोत! त्यांना पश्चाताप होवू नये की आपण यानां का निवडुन दिले? आपल्या काय अपेक्षा होत्या आणि आपण काय पहातो आहोत? त्यांच्या रास्त अपेक्षांचा भंग होणार नाही ना याची काळजी घेणे आगत्याचे ठरते. अपेक्षाभंगापेक्षा मोठ दु:ख अन्य कोणतेही नसते…! आपल्या अस्तित्वावरंच जेंव्हा प्रश्नचिन्ह उभे रहाते तेंव्हा कुठल्या परिस्थितिचा सामना करण्याची वेळ येवू शकते यासंदर्भात माकडीनीचे उदाहरण इथे आठवल्याशिवाय रहात नाही. जोपर्यंत नाकातोंडात पाणी शिरत नाही तोपर्यंत ती पिलाला जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते परंतु जेंव्हा नाकातोंडात पाणी जायला लागते तेंव्हा तीच माकडीन पिलाला, पोटच्या गोळ्याला पायाखाली घेवून आपला जीव वाचवायचा प्रयत्न करत असते हे विसरून नाही चालत.
          
एक काळ असाही होता सत्ता ही गाजविण्यासाठी, स्वहित जपण्यासाठी नाही तर जनसेवेसाठीचं, राष्ट्राच्या विकासाचं साधन समजली जायची. पण दैवदुर्विलास असाकी "सत्ता हे साधन न रहाता ते साध्य बनलेलं आहे…! साध्य आणि साधनसुचितेला फारकत देत लोकशाहीच्या मुलतत्वांनाच ठोकरलं जातय, लोकांच्या मागण्या पुर्ण करतांना त्या किती रास्त आहेत, किती अवास्तव आहेत याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते आणि केवळ आणि केवळ लोकांची नाराजी ओढवू नये, त्यांनी आपलं प्रतिनिधित्व झिडकारूनये, आपला पराभव होवूनये, सत्ता हातातून जावू नये म्हणून अवास्तव जाहिरनामे, अव्यवहार्य मागण्याच्या पुर्ततेच्या अश्वासनांची खैरात करने कितपत योग्य आहे याचाही सारासार विचार होत नाही. प्रचलित व्यवस्थेविरोधात भ्रष्टाचार, अनागोंदीमुळे सर्वसाधारण जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला आहे. घराणेशाही, जात समिकरणे, रिमोटकंट्रोलच्या दबावाखाली प्रभावहीन, लेच्यापेच्या धोरणांची भुमिका घेणे हे लोकशाही प्रशासनासाठी घातक ठरत असते. सत्तेची कवचकुंडले त्यावेळी कुचकामी ठरू शकतात. "कोंबडा डालेखाली कितीही झाकून ठेवला तरी तो आरवल्याशिवाय रहात नसतो!" जनतेच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होवून एकप्रकारची अस्वस्थता भरून राहिलेली आहे. या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर जनता पर्यायाच्या शोधात आहे. कुठल्याही पक्षाला स्बळावर सत्ता स्थापन करण्याइतपत जागा मिळणे दुरापास्त झाले आहे! म्हणून युतीचा पायंडा रूढ झाला आहे. युती तरी किती पक्षांची असावी? दोन वा तीन पण तेही शक्य राहिलेले नाही म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे…!  हा संभ्रम सर्वसाधारण जनतेच्या पचनी पडत नाही. तिस-या आघाडीमध्ये अपेक्षित आहे की सर्वांनी एका  जाहिरनाम्याखाली एकत्र येणे. आणि हे जर शक्य होत असेल तर पर्याय म्हणून वेगवेगळ्या अस्तित्वापेक्षा एकजुटीने एक होण्यात काय गैर आहे…? अमेरिका, इंगलंड  या प्रगत देशात ही  पध्दत अवलंबिली जातेच ना. आजचे युग हे प्रिंट-मिडिया, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचं, फेसबुक, वाट्सअप सारख्या "सोशल साइट्सचं" आहे. पारंपरिक प्रचार-प्रसिध्दी, सभा, गाठी-भेठी पेक्षा ते कितीतरी गतिशील आहे. या माध्यमांचा वापर करण्याचं तंत्र आज उपलब्ध झालं आहे. प्रचलित व्यवस्थेचा उबग आलेला,  वैतागलेला वर्ग विनासायास, सहजासहजी या अधुनिक व अभिनव प्रचार पध्दतीस प्रतिसाद देत आहे. जेंव्हा निराशाजनकता मनाचा ताबा घेते तेंव्हा प्रचलित व्यवस्थेविरूध्द समाजमनात असंतोष खदखदू लागतो. या असंतोषाने समाजमन संभ्रमित होवून पर्यायाचा शोध घेत असते. असा असंतोष कांही प्रथमच होतोय असं नाही. जयप्रकाश नारायण , व्ही. पी. सिंग ,  अण्णा हजारे यांचे निमित्ताने चळवळीच्या माध्यमातून प्रकट झालेला आहे, होत आहे. हे स्वागतार्ह असलेतरी तिथेही एक गल्लत होतेय. समाजमनामध्ये वैफल्य निर्माण झाल्यास प्रचलित व्यवस्थेविरोधात जो दंड ठोकतो त्याच्याकडे भाबड्या आशावादाने बघत वैफल्यग्रस्त जनता त्याच्या पाठीशी उभी रहाते. तो तसा आशावाद निर्माण करण्यासाठी आधुनिक प्रचारतंत्राचा कल्पकतेने उपयोग करत असतो. समाज एका अर्थाने असंघटित असतो असं म्हणनं धारिष्ट्यपूर्ण ठरेल पण तो या अर्थाने असंघटित असतो की तो व्यक्ति, कुटुंबात विभागलेला असतो. त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक प्रश्नांमुळे तो चळवळीला पुर्णवेळ देवू शकत नाही म्हणून अशा चळवळीच्या माध्यमातून आपले प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन चळवळीशी जोडला जात असतो. असाच समाज चळवळीत सामिल झालेला असतो असा समाज अशी जनता उस्फुर्तपणे प्रासंगिक कारणवश एकत्र येते आणि प्रदर्शन करते पण दुरदैवाने ते ही प्रासंगिकच ठरते! कालांतराने ती आपल्या वैयक्तिक प्रश्नांमध्ये गुरफटून जाते. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार, माहिती अधिकार अशा लोकपयोगी प्रश्नांवर व्यापक चळवळ उभी केली. त्याला जनतेने अभुतपूर्व  प्रतिसाद दिला, अण्णांच्या  निरिच्छ, स्वच्छ प्रतिमेमुळे ही चळवळ देशव्यापी बनली आणि तिला प्रचंड यश प्राप्त झालं. त्याचं फलीत म्हणून शासनाला भ्रष्टाचार निर्मुलन कायदा, माहिती अधिकार कायदा अशे महत्वपूर्ण कायदे करणे भाग पडले. या अभूतपूर्व यशामुळे कांही संघटना, चळवळी अन्नांच्या छत्राखाली येण्यात धन्यता मानू लागल्या.
         
अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार निर्मूलनाचा अजेंडा घेवून अण्णांच्या  छत्राखाली आपली "टीम" घेवून दाखल झाले. प्रसार माध्यमांनी त्यांच्या भोवती प्रसिध्दीचे वलय निर्माण केले. सोशल साइटसच्या करिष्म्याने तरूणाई, तसेच  भ्रष्टाचाराच्या विळख्यात कधीनकधी, कुठेनिकुठे पिचलेल्या जनतेने त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला.  या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अवास्तव जाहिरनाम्याच्या, अकल्पिक स्वप्नांच्या जोरावर अनपेक्षितरित्या दिल्ली काबिज केली. परंतु जेंव्हा वास्तवतेचे चटके बसू लागले, त्याची खरी धग जाणवायला लागली, वास्तवतेचा सामना करने अशक्य होवून बसले तेंव्हा या ना त्या कारणावरून पायउतार होण्याची वेळ ओढवली. भ्रष्टाचार ही शासनव्यस्थेलाच नाहीतर काम करणारे आणि करवून घेणारे या सर्वांनाच लागलेली कीड आहे! ती जादूची कांडी फिरवून सहजासहजी नष्ट होणार नाही. ती नष्ट करण्यासाठी प्रदिर्घ उपाययोजना अमलात अणाव्या लागतील. भ्रष्टाचार हाच एकमेव प्रश्न विकासाचा अडसर नाही तर या प्रश्नाप्रमाणेच सामाजिक, आर्थिक प्रश्नामध्येही प्रचंड विषमता फैलावली आहे. तिकडे दुर्लक्ष किंवा डोळेझाक करून चालणार  नाही. नुकताच घडलेला घटनाक्रम पहाता तेच घडताना दिसले. अरविंद केजरीवाल यांच्या कारभाराकडे जनता मोठ्या आशेने डोळे लावून बसली होती. परंतु त्यांची अतिघाई त्यांना नडू लागली. मंदिराच्या कळसापर्यंत पोहचण्यासाठी भलेही शिघ्रतेने जायचं असेल तरीही पायरीपायरी ओलांडावी लागते याच भानही बाळगायला हवंच, ते भान सुटून जर घाईघाईने एखादी पायरी चुकली तर पाय मोडून घ्यायची वेळ येवू शकते! मग इप्सित दूर गेल्याचा मनस्ताप ओढवून घ्यायची वेळ येते. सांसदीय कार्यप्रणालीचं औचित्य, पावित्र्य अव्हेरण्याचं धारिष्टय बाळगण्यात येवू लागले ते अव्हेरून कसं चालेल! या कार्यप्रणालीमध्ये "हम करेसो कायदा" हा दुराग्रह अततायीपणाचा ठरंत असतो. दुरद्रष्टीचा अभाव, अननुभवी, अतिउत्साही सहका-यांची मांदियाळी ही विजयासाठी पुरेशी ठरत नसते. त्यासाठी पुरेसा अभ्यास, संयम फार उपयुक्त ठरत असतो नाहीतर "आपलेच पाय आपल्याच गळ्यात"  पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो! गर्दी जमवून चळवळ उभारण्या बरोबरच लोकात मिसळून त्यांच्या ख-याखु-या समस्यांचा मागोवा घेवून त्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना अवलंबील्या जाणार आहेत याचा जनतेमध्ये विश्वास निर्माण करणेही जरूरीचे असते. एकुणएक पहाता सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रम वाढतच चालला आहे…! सर्वसामान्य जनता आज बघ्यांची भुमिका घेते आहे असं बिल्कुल वाटून घेण्याच कारण नाही ती सर्वज्ञ झाली आहे, जाणकार झाली आहे, या अराजकतेला, यादवीच्या भांडणाला ती विटली आहे. सर्वसामान्यांकडे परिस्थितिची जाण आणि भान उत्तम असते, तिचं विश्लेषण समर्पकरित्या सामान्यजनताच करत असते,त्यामुळेच ती पर्यायाच्या शोधात आहे. लोकसभेचे वारे केंव्हाच वहायला सुरू झाले आहे! आता तर त्याचं वादळात रूपांतर होताना दिसत आहे,  उमेदवार निवडीवरून पक्षांतर्गतच डोके फोडाफोडी सुरु झाली आहे…! हे झंजावाती वादळ दारापर्यंत पोहचेल, विविध प्रसारमाध्यमातून घराघरात पोहचेल. या वादळात पाचोळ्यागत दिशाहीन भिरभिरत काटाकुपाट्यात पडणे सर्वसामान्य मतदाराला नाही परवडणार. लोकशाहीचा गड काबीज करण्यासाठी निरपेक्ष, दूरद्रष्टीचा, अनुभवी लोकप्रतिनिधी मग तो कोणत्याही पक्षाचा असो निवडून द्यावा लागेल. अशा लोकप्रतिनिधींचं संख्याबळ वाढल्यावर भलेही युती करावी लागली तरी ती अभद्र ठरणार नाही. सभागृहात सारासार विचार केला जाईल, स्वहीत, पक्षहीता पेक्षाही लोककल्याणकारी हीतांचा प्राधान्याने विचार होईल. सामाजिक, आर्थिक भान सुटणार नाही, ती विकसनशील शासनव्यवस्थेसाठी, निकोप आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी पुरक ठरेल. संसद कुस्तीचा अखाडा न बनता लोकहिताच्या कार्यपुर्तीची कार्यशाळा बनेल. निर्णयाचं शस्त्र तुमच्या अमच्यासारख्या मतदारांच्या हाती आहे. परंतु या शस्त्राचा मतदार वापर किती प्रभावीपणे करतात ही बाबही अत्यंत चिंतनीय बनलेली आहे. एकुणच सरासरी मतदान पन्नास/साठ टक्केच होते ते निवडणूक लढवणा-या सर्व उमेदवारांमध्ये विभागले तर बहुमताने निवडून आलेल्या उमेदवाराच्या मताची टक्केवारी एकुण नोंदणीकृत मतदार संखेशी काढून पाहिली तर निवडून आलेल्या उमेदवारास खरेच बहुमताने निवडून आला म्हणने कितपत योग्य ठरेल? तो उमेदवार किती लोकांच प्रतिनिधित्व करतो हा ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी "जागो मतदार जागो" हा नारा देत ख-या अर्थाने सजग होवूया आणि "एकसाथ सावधान" म्हणत एकदिलाने लोकशाही शासनप्रणालीला जपूयात .