Saturday 12 April 2014

"शब्देवीन संवादू"


"शब्देवीन संवादू"

ऐकले जे गुज दुजियाचे मुखी,

दुजा सांगे तिज्या आठवे जो विचार

सांगू जाता तिजा चौथ्याशी,

गुज ती वाणी होय विपरीत…!

दाहीमुखी पसरता मुळ तो विचार

कोठे होय लुप्त नकळे पामरा,

म्हणोनिया ऐकावे मुळ त्या विचारा

सांगावांगीवरी विश्वास नोहे बरा…!


          आपण समाजामध्ये वावरत असतांना कांही गोष्टी आपण ऐकण्यामध्ये, समजण्यामध्ये गल्लत करीत असतो या गल्लतीमुळे मोठा घोटाळा निर्माण होतो ज्यामुळे अर्थाचा अनर्थ होवून तो मोठ्या संकटाची नांदी ठरू शकतो. पेशवेकालीन इतिहासामध्ये "ध चा मा" केल्यामुळे किती अरिष्ट ओढवले गेले हा इतिहास सर्वज्ञात आहे. "ध चा मा" करणारा अत्यंत धुर्त असतो! अंमलबजावणी करणाऱ्याचे कच्चे दुवे त्याला पुरेपूर माहित असतात, नव्हे तर तो कच्चे दुवे शोधण्यात चतुर असतो. त्या दुव्याचा स्वहित साधण्यासाठी वापर करून घेण्याइतपत तो चाणाक्ष असतो! आपले इप्सित साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. त्याचा कावा ओळखता आला तर माणसंच काय जगही जिंकण सोप जाईल…! परंतु नाही तसं घडत नसतं. कारण त्याने पसरलेल्या मायाजालाच सामर्थ्य एवढ जबरदस्त असतं की भलेभले महामानव, ऋषिमुनीही हतबल ठरतात! मग सर्वसामान्यांची गत ती काय असणार, एक प्रकारचं अंधत्व हे मायाजाल निर्माण करत असतं. या मायाजालातून बाहेर पडणारा विरळाच! महाभारतात सर्वज्ञ लक्ष्मणाला माहिती असतं की सुवर्णमृग हा एक मायावी राक्षस आहे तरीही सीतेच्या दुराग्रहापुढे लक्ष्मणाचा नाईलाज होतो. मारीचाच्या मायावी रूपास सीता भूलते त्याच्या प्राप्तिसाठी लक्ष्मणाकडे दुराग्रहाने अट्टहास करते, लक्ष्मण वास्तव समजावून सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करतो पण मायाजालाच्या विलक्षण प्रभावामुळे सीता कांहीही ऐकायला तयार नसते. त्यातून घडलेले रामायण, झालेला संहार सर्वश्रूत आहेच…! परंतु त्यापासून आम्ही धडा घेत नाही यापेक्षा मोठा दैवदुर्विलास आणखी कोणता असू शकतो?

          आजही विसंवादाचं विषारी तन फारच माजलय…! उभ्या पिकाची ते हां हां म्हणता नासाडी करत सुटलय! बहरात आलेले पीक डोळ्यादेखत जळताना, अवर्षणात होरपळताना, गारपिटीत झोडपून नष्ट होताना पाहून होणारं दु:ख किती जीवघेणे असते हे पीक बहरावे म्हणून हाडांची काडं करत रक्ताचं पाणी करून घाम गाळणा-या शेतकऱ्यांशिवाय इतरांना नाही कळायचे! दु:खातिरेकाने एक तर ह्रदय विकाराने जीव गमावण्याची वेळ येते नाही तर गळफास लावून आत्महत्या करण्याची पाळी येते…! म्हणून हे माजलेले तणकट  कमी करण्याचा अल्पसा तरी प्रयत्न करावा म्हणून हा लेखन प्रपंच

        शासन विकासासाठी निरनिराळे कायदे करतं, शासन निर्णय काढून विकसाच्या योजना आखतं आणि यंत्रणांकडे राबविण्यासाठी सुपुर्द करतं. भोळ्याभाबड्या जनतेला वाटतं विकास आपल्या दारातच येवून ठेपला! पण दुर्दैवाने तो भाबडेपणाच ठरतो. इतकाही भाबडेपणा नसावा हा भाबडेपणा अंगी बाळगण हाही एक प्रकारचा गुन्हाच ठरतो. कायद्याचे ज्ञान नाही या सबबी खाली अज्ञानाच समर्थन करताच येत नाही. सत्य जाणून घेणे, कायद्याची माहिती जागरूकतेने करुन घेणे ही जबाबदारी आपली प्रत्येकाचीच असते. विविध प्रसारमाध्यमे, "माहितीचा अधिकार" यासारखे कायदे आपल्या मदतीसाठी तत्पर असतात हेही नाकरता येत नसते. "साप साप म्हणत भुई धोपटनं" केंव्हाही चुकीचच असतं. काठी मोडून जाते भुईला फारशी इजा होत नसते, साप मात्र निघून जातो म्हणून सत्यासत्य जाणून घेतले तर दुर्दशा टळू शकते. अन्यथा वाताहात ही अटळ ठरते. कायद्याचा, शासननिर्णयाचा अर्थ हा आपले वैयक्तिक हीत, स्वार्थ जपण्यासाठी कांही धुर्त मंडळी स्वअर्थ काढून स्वार्थ साधत विकासाला हमरस्त्याने पळवतात, गल्लीबोळात फिरवतात की रानोमाळ पसरवतात हे सर्वसामान्यांच्या आकलना बाहेरचे असते…! विकास तर दृष्टीस दिसत नाही मात्र विकास झाल्याचा डांगोरा पिटला जातो. परिणामी भ्रष्टाचाराचे आरोपप्रत्यारोप होत रहातात, मोठमोठ्या चळवळी उभारल्या जातात, आंदोलने केली जातात  समाजात हे विसंवादाचं भूत थैमान घालत असतंत्यासाठी संवाद हा सुसंवादी व्हायला हवा. त्यासाठी संवादकौशल्य हवं असतं. आपण काय बोलतो, कशा पद्धतिने बोलतो ते समोरच्याला समजले की नाही याचं आकलन व्हायला हवं. तद्वतच समोरचा काय आणि कुठल्या हेतूने बोलतोय, त्याचा हेतू काय आहे तो शुद्ध आहे काय? हे समजून घेता आलं पाहिजे, ते समजले तर गुंता होणारच नाही.

           स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या प्रशिक्षणवर्गावर प्रशिक्षक म्हणून मला पाचारण केले जाते. संवादकौशल्य हा माझा आवडीचा विषय म्हणून प्रशिक्षणार्थ्यांना विसंवादामुळे अर्थाचा सोयीस्कर गैरअर्थ कसा काढला जातो, त्यामुळे अनर्थ कसा ओढवला जातो हे पटवून देण्यासाठी आम्ही खेळ खेळायचो, मी एका को-या कागदावर संदेश लिहून काढायचो मग एका प्रशिक्षणार्थ्याला व्यासपीठावर बोलावून घ्यायचो, त्याला तो संदेश मनातल्यामनात वाचायला लावायचो. त्याच्या पुर्णपणे लक्षात राहील, त्याचं समाधान होईल तितका वेळ त्याला वाचू द्यायचे. तो ज्यावेळी म्हणेल, "सर आता माझ्या लक्षात आले." त्यानंतरच दुसऱ्या प्रशिक्षणार्थ्याला व्यासपीठावर बोलावून पहिल्याला तो संदेश फक्त दुसऱ्यालाच ऐकू जाईल अशा रितीने कानात सांगायला लावायचा. याचपद्धतीने तो संदेश दुसऱ्याकडून तिस-याकडे, तिस-याकडून चौथ्याकडे, चौथ्याकडून पाचव्याकडे कर्णोपकर्णी देत रहायचा. मग शेवटच्या सहभागी प्रशिक्षणार्थ्याला काय संदेश मिळाला ते विचारायचे आणि पहायचे काय मजेशीर आणि गमतीदार उत्तर ऐकायला मिळतं ते. संदेशाच्या किती विपरीत येते याचे एक गम्मतशीर उदाहरण पहा मी जाणीवपूर्वक व्यवहारातील संदेश लिहून द्यायचो तो असा असायचा, "घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी घरातील महिलांचा विचार घेवूनच बांधकामाचा आराखडा तयार करावा." हा संदेश वरीलप्रमाणे कर्णोपकर्णी फिरवायचा शेवटी पहायचे त्या संदेशाचं उत्तर शेवटच्या विशेषतः महिला सहभागी कडून काय ऐकायला मिळायचं ते विसंवादाचा किती भयानक परिणाम होतो याचं उत्तम, डोळ्यात अंजन घालणारं आहे, उत्तर ऐकायला मिळाले ते असे होते, "घराचं बांधकाम झालं आहे, तुम्ही आता काय करायचं ते करा!" यापेक्षा विसंवादाच्या भयानक परिणामाचे उदाहरण आणखी कोणतं असू शकते? अशा अंमलबजावणी करणाऱ्या प्रतिनिधींच्या मग ते प्रशासनातील असोत वा प्रशासनाबाहेरील त्यांच्या हाती विकास योजना पडल्यावर विकास योजनांचं काय फलीत मिळंत असेल ते सुज्ञास सांगणे नलगे…! शासकीय योजनांची अंमलबजावणी करते वेळी त्याची प्रचिती आल्यावाचुन रहात नाही.  शासन विकासाच्या निरनिराळ्या योजना आखतं आणि  अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुकास्तरावर जबाबदारी टाकतं. तालुकास्तरावरून योजना राबविण्यासाठी गावपातळीच्या कर्मचारी, आधिकारी, पदाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात येते. कर्मचार्‍यांच्या निवडीसाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. अशी किमान शैक्षणिक अहर्ता पदावर निवडीसाठी पुरेशी असली तरी "व्यक्ति तितक्या प्रकृती" या तत्वानुसार प्रत्येकाचीच बौद्धिकपातळी, आकलनशक्ति, समज ही परिपक्व, प्रगल्भ असेलच असे नाही. तद्वतच गावपातळीवरही लोकशाही शासन पद्धतिनुसार "लोकप्रतिनिधी" निवडुन देण्यासाठी शैक्षिणक अहर्ता आवश्यक नाही! आणि आजकाल तर फक्त आणि फक्त निवडुन येण्याची क्षमता असावी हेच एकमेव ग्रहितक महत्वपूर्ण ठरलं जाऊ लागले आहे…! मात्र त्यासाठी ज्या पात्रता ठरल्या जात आहेत त्या कलनशक्तिच्या पलीकडच्या आहेतउमेदवाराकडे भरपूर पैसा हवा मग तो कोणत्याही मार्गाने कमवलेला  असला (अर्थात गुन्हेगारी मार्गाने सुद्धा!) तरी चालतो, पक्षांतर करून नव्याने पक्षात प्रवेश केलेला असला तरी हरकत नसते, तो विशिष्ठ जाती/धर्म/ पंथामध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व प्रस्थापित करू शकणारा असावा, निवडणुकीत एकतर दहशत निर्माण करून अथवा प्रलोभन दाखवून निवडुन येणारा असावा! कारण सर्वसामान्य जनता एकतर लोभी प्रवृत्तीमुळे विकली जावू शकते किंवा ती भित्रीतरी असते ही मानसिकता ओळखली गेलेली असते म्हणून या पात्रते अधारे निवडुन आलेल्या उमेदवारांच्या अधारे बहुमत सिद्ध करता येते मग सत्ता हातातून जाण्याची भितीच रहात नाही! असे लोकप्रतिनिधी आणि अपरिपक्व कर्मचारी यांच्या हाती योजना पडल्यावर त्या अक्षरशः पडणारच! योजनांच्या हेतूमधे शंका निर्माण करण्यासाठी ही मंडळी कारणीभूत ठरत असते. इथेही विसंवादाचे तत्व काम करीत असते. अपरिपक्वतेमुळे, प्रगल्भतेअभावी गावपातळीवरील कर्मचारी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना योजनांचा हेतू समजाऊन देण्यामध्ये एकतर असमर्थ ठरतात किंवा आपमतलबी धोरणामुळे हेतु दडवलेला असतो. ज्यांच्यासाठी योजना आखलेल्या असतात त्यांना तो स्पष्ट समजावून दिला जात नाही,  त्यामुळे संद्ग्धिता व संभ्रम निर्माण होतो, विश्वासपात्रता गमावली जाते. आरोपप्रत्यारोप होवू लागतात, योजना रखडल्या जातात,  भ्रष्टाचार फोफावला जातो…!  विकास हा शब्दच फसवा ठरतो, याचे खापर शासनप्रणालीवर फोडले जाते. ते फोडण्यासाठी "जागरूक" मंडळी टपुनच बसलेली असते त्यांच्या हाती आयते "कोलीत" मिळते. म्हणून लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी सुद्धा किमान शैक्षणिक पात्रतेसह त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, जाण,  निसंदिग्ध चारित्र्य किमान यातरी अटी आवश्यक वाटु लागल्या आहेत. मतदारांनीही निवड्णुकीच्यावेळी कुठल्याही प्रलोभणाला बळी न जाता मतदानाच्यावेळी सद्सद्विवेक जागृत ठेऊन मतदान केलेतर निश्चितच पात्र उमेदवार लोकप्रतिंनिधीत्व करतील.  या पात्रतेचे उमेदवार जर लोकप्रतींनिधी म्हणून निवडून सत्तेमध्ये गेले तर लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संदेह,  अविश्वास राहणार नाही. विसंवादाला तोंड फुटून अराजकता निर्माण होणार नाही, लोकशाहीला बाधा पोहचणार नाही. योजना यशस्वीपणे राबवल्या जातील आणि खराखुरा विकास साधेल यात शंका बाळगण्याचे कारणच राहणार नाही.
     यासाठी संवाद हा विसंवादात परिवर्तित होवू देण नाही परवडणार! त्यासाठी "शब्देवीन संवादू" साधायला शिकता आलं पाहिजे. ते साधता आलं तर नांदेल सूखसमृद्धीचं साम्राज्य, आनंदाचे रामराज्य  दारोदारी…!