Sunday 22 June 2014

येरे येरे पावसा .....!

       मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्राचा प्रवेश झाला आहे, तरीही आणखीन खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झालेलाच नाही! पेरण्या खोळंबल्या आहेत, बळीराजा हवालदील झालाय! आम्ही शहरवासी हवालदील झालेलो नसलो तरी चिंताग्रस्त निश्चित झालो आहोत. अशा विमनस्क मनस्थितीत महाराष्ट्र टाईम्स वाचत बसलो होतो, औरंगाबादTimes चे "गाणं मनातलं" सदर वाचू लागलो तोच मुलांनी अचानक टी. व्ही. सुरू केला माझं मन विचलीत झालं, याला योगायोग म्हणावे की आणखीन काय? कळत नव्हते! कारण मुलांनी 'जिंगल टून्स' ने बालमित्रांसाठी बनविलेली खास कार्टून सीडी सुरू केली होती. त्यातील नेमकी पावसाची गाणी मुलांनी लावली होती, माझेही पेपर वाचनातले लक्ष उडाले होते! मुले आनंदाने गाण्याचा मनसोक्त अस्वाद लुटंत होती. मुलांच्या बालसुलभतेला मीही मुग्धपणे दाद देवू लागलो.....
लहानग्याच्या कृतककोपाने गाण्याला सुरूवात होते, त्याचं ते भाबडेपण, लटक्या रागाने पावसाला साद घालनं, रागाने बोट चावनं, कपाळाला हात लावून पावसाला.....

                                           येरे येरे पावसा रूसलास का
                                           माझ्याशी कट्टी तू केलीस का?
                                           झरझर तू येणार कधी
                                           अंगणात पाण्याची होईल नदी
                                           ढगांच्या मागे तू लपलास का
                                           माझ्याशी कट्टी तू केलीस का?
ही साद जीवाला चटका लावून जाते! पावसाची आर्त ओढ लहान थोरांना सर्वांनाच लागलेली असते फक्त त्याचे संदर्भ वेगवेगळे असतात, पावसाच्या आभावी थोरामोठ्यांना भविष्याची चिंता लागून रहायलेली असते. पाऊस नाही आला तर शेत कसं पिकेल, शेत नाही पिकलं तर खायचं काय? कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी काय करायचं अशा ना ना विवंचना सतावत रहातात. पण या विवंचना निरागस बालकांच्या गावीही नसतात त्यांना मौज मस्ती करायची असते आणि ती मौजमस्ती बालगीतकाराने या गाण्यात समर्थपणे उतरवली आहे बालगीतकारा सोबत मुले गार गार वाऱ्यासोबत चिंबचिंब भिजू लागतात!
                                           गार गार वाऱ्यात नाचेन मी
                                           खूप खूप पाण्यात भिजेन मी
                                           भिजायची टाळी मला देतोस का
                                           माझ्याशी कट्टी तू केलीस का?
         गाण्यातील गार गार वाऱ्याची झुळूक मुलांना नाचवीत होती, त्यांना पाण्यात खूप खूप भिजायचं होतं! परंतू आईची परवानगी मिळत नव्हती म्हणून त्यांनी रास्त पावसालाच साकडं घातलं होतं! मन भुतकाळात शिरलं, अरे! आम्हीही  असंच करायचो की! खरंच पिढ्यानपिढ्या हा खेळ चालत आला आहे आणि पुढे ही पिढ्यानपिढ्या तो चालत रहाणार आहे! माणसाच्या अन पावसाच्या पाठशिवणीचा खेळ युगानुयुगे असाच चालत रहाणार काय!
गाणं पुढे पुढे सरकत होत, बरं वाटत होतं वास्तवातील दाहकता विसरून मन गाण्याच्या तालावर भुतकाळात रमत होतं!
                                            धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
                                            मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
                                            गडगड आता हसतोसका
                                            माझ्याशी कट्टी तू केलीसका?
        किती किती पाऊस व्हायचा त्यावेळी, रस्तोरस्ती पाण्याचे पाट वाहू लागायचे, नदीनाले तुडूंब दुथडी भरून वहायला लागायचे! गावाला वळसा घालून जाणाऱ्या नदी किनाऱ्यावर गर्दी जमायची ऐलतिरी, तेवढीच शेतातून परतलेल्या अबालवृद्धांची पैलतीरीही! मदतीसाठी आरडाओरडा आरोळ्या देणं सुरू असायचं, पण रोंरावत धावणाऱ्या पाण्याच्या आवाजापुढे कोण काय म्हणतोय कळायचंच नाही! पूर ओसरला तरी मांड्या कमरेला पाणी लागायचे, लहानगे, बायाबापड्यांना वाहत्या पाण्यतून येता यायचं नाही. एकमेकांच्या मदतीला धावून जायची संस्कृती त्यावेळी जिवंत होती! स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तरणीताटी पोरं मदतीला धावून यायची. हे अनुभवतानाचा आनंद स्वर्गातित असायचा! पावसाळा आलाकी या अनुभुतीचा आनंद घ्यायला मन आतूर व्हायचं! म्हणून असा धुवांधार पाऊस यावा रस्ते पाण्यात बुडून जावेत आणि शाळेला सुट्टी मिळावी अशी भाबडी आळवणी पावसाकडे करायची! मुले गाण्याचा आनंद लुटंत होती! पण माझे लक्ष आता उडाले होते. हेच गाणे माझ्यापुढे वेगळ्या संदर्भाने नाचू लागले......
                                           येरे येरे पावसा रूसलास का?
                                           (शेतकऱ्यांशी) कट्टी तू केलीस का,
                                          झर झर तू येणार कधी
                                          (शेतात पाण्याची बरसात कधी?)
                                          ढगांच्या मागे तू लपलास का
                                          (शेतकऱ्यांशी) कट्टी तू केलीस का?
         या ओळींनी मला अलगद उचलून गावाकडे नेले आणि हवालदिल झालेल्या माझ्या शेतकरी राजाचे ढगाकडे लागलेले आर्त डोळे, चेहऱ्यावरचे चिंताग्रस्त भाव माझ्या ह्रदयाला पीळ पाडू लागले! उन्हा तान्हात पाण्यासाठी वण वण भटकणाऱ्या माझ्या भगीनींच्या पायाला बसणारे चटके माझ्या पायाला जाणवू लागले! का हे चटके आम्हाला भाजून काढतायत? ही कुणाच्या करणीची देणगी आहे? मानवाला कुणी शाप दिलाय की काय? मग त्याचा परिणाम अवघ्या जीवसृष्टीला का भोगावा लागतोय? कारखान्याचं पसरलेलं जाळं, त्यामुळे वातावरणात कार्बनडाईआक्साइडमुळे होणारे वायुप्रदुषण, नदीनाल्यात सोडलेल्या दुषित पाण्यामुळे होत असलेल्या जलप्रदूषणामुळे अवघ्या जीवसृष्टीचं अस्तित्वच पणाला लागलय! भरीसभर आमच्या भौतिक सुखसोयी साठी विज्ञानाला वेठीस धरलय! म्हणून  ते वरदान ठरायच्या ऐवजी शाप ठरतयकी काय अशी भिती वाटू लागलीय! प्रदुषणाला आळा घालणाऱ्या वृक्षराजीवर कुराड चालवीतांना आम्ही आमच्याच पायावर कुराड चालवतोय याचं भानंच जणू आम्ही हरवून बसलोय!  हे भान सुदैवाने आम्हाला कधी येईल! पावसाचे नाही तरी माझ्या डोळ्यात पाणी तरळून गेले! गाणे मनात रुतून बसले!