Saturday 25 January 2014

धुडगुस

उबग आलाय आता
समाजात पसरलेल्या धुडगुसाचा,
जिथे हात जोडावे
तिथे जोडले जात नाहीत
भलतीकडेच जोडावे लागतात!

मनात नसतांना स्मित येते लाचारीने
या लाचारिने व्यभिचार
शिष्टाचार ठरवला जात आहे…!

आता बापूजींच्या माकडांनी
डोळे उघडले पाहिजेत,
कानांनी आक्रोश ऐकुन
निर्भीडतेंने बोलले पाहिजे.
अन्यायाला वाचा फोडंत
माणुसकीला जागले पाहिजे…!

                           जगदीश गिरी.

Thursday 23 January 2014

राष्ट्रीय पुरूषांचे स्मृतिदिन...

         २६ जानेवारी आपला राष्ट्रीय सन स्वातंत्र्य दिन म्हणून आपण शासकिय पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. तसाच यावर्षीही साजरा करणार आहोतच. हे सांगण्याची गरज वाटली ती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक: संकिर्ण २०११/१०६९/ प्र.क्र.४१८/२९ तारीख:-१६, नोव्हेंबर २०१३ वाचून. परिपत्रकात नमूद केलं आहे की, " सदर कार्यक्रम राष्ट्रपुरुषांचे/थोर व्यक्तींच्या कार्याचे चिरंतन स्मरण व त्यांचे प्रती क्रतज्ञता व आदर व्यक्त करण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात येतात." अशा थोर व्यक्तिंच्या कार्याची शासनाने परिपत्रक काढून आठवन करून द्यावी लागावी.! कारणही दिले गेले आहे ते एकाद्या राष्ट्रप्रेमी, संवेदनशील व्यक्तिला लांच्छनास्पद असल्याचे वाटल्यावाचून रहाणार नाही. परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, "तथापि असे निदर्शनास आलेले आहे की, सदर कार्यक्रमास अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती अत्यंत नगन्य असते. ही बाब कार्यालयीन शिस्तीच्या अनुषंगाने योग्य नाही." 
           खरंच इतक्या लवकर आपणास राष्ट्रपुरूषाच्या कार्याचे विस्मरण व्हावे…? या ज्ञात अज्ञात राष्ट्रपुरूषांनी आपल्या आयुष्याची, घरादाराची राखरांगोळी केली ती स्वत:च्या, स्वत:च्या कुटुंबाच्या  स्वातंत्र्यासाठी,  सुखासाठी करतोय असं कधी त्यांच्या स्वप्नातही वाटलं नाही. कारण त्यांच्या भावना, त्यांचा त्याग किती उदात्त होता हे  विस्मरणाच्या  रोगाने ग्रस्त झालेल्यांना कसे कळणार म्हणा… म्हणून त्याची दख़ल घेत राष्ट्रपुरूषांच्या कार्याचे परिपत्रक काढून स्मरण करून देण्याची वेळ शासनावर  यावी? कारणही तसेच आहे आता त्या  निस्वार्थ पिढीच्या जागी नवीन पिढी उदयास आली आहे.! म्हटलंच आहे ना, "घडी गेली, पिढी गेली." ती घडी गेली, तिच्या पाठोपाठ ती पिढीही जात आहे…! मला आठवतं आमची पिढी स्वतंत्र्योत्तरच्या नजिकच्या काळात जन्मलेली त्यामुळे विस्मरणाच्या रोगाला बळी न पडलेली. पंधरा ऑगस्ट , सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सन आमच्याही शाळेत साजरे केले जायचे, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लालबहादुर शास्त्री ईत्यादी राष्ट्रपुरूषांचे स्मृतिदिन साजरे केले जायचे. नोटिस फिरवली जायची, निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन केले जायचे. किती उत्साह ओसंडून वाहायचा त्यावेळी! विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वजन अगदी भारावून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी "अनौपचारिकतेने" सहभागी व्हायचे. आम्ही आठआठ/पंधरापंधरा दिवस सराव, तयारीसाठी मोठ्या उत्साहात सहभागी होत असू. प्रभातफेरी, स्पर्धेमध्ये सामील होण्यासाठी आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कपड्यांना ईस्त्री करण्याचा कार्यक्रम आणखीही ताजा असल्यासारखा जसाच्या तसा आठवतो! त्यावेळी लाँड्रीची उपलब्धता नसायची असली तरी परवडणारी नसायची, म्हणून आम्ही घरीच पितळी तांब्यामध्ये कोळस्याचा हार (पेटलेले कोळसे) टाकायचो आणि कपड्यांची "ईस्त्री" करायचो! सगळं कांही अकृत्रिम असायचं, फार फार मजा यायची. विद्यार्थ्यांच्या, गुरूजनांच्या, थोरामोठ्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्रभक्ति, स्वातंत्र्यवीरांचा असीम त्याग, बलीदानांचा गौरव ओतप्रोत भरलेला असायचा. राष्ट्रपुरूषांचे गुणगौरव ऐकताना आमची छाती फुलून यायची.
             आजही कार्यक्रम आयोजित केले जातात, लंबीचौडी "भाषणबाजी" होते! ब-याचदा ती भाषणबाजी ऐकून ऐकणारांचीच कीव यावी इतपत वाचाळता, बाष्कळता फसफसून चाललेली असते! राष्ट्रपुरूषांचे/थोर व्यक्तींच्या कार्याचे स्मरण, त्यांचेप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याची भावना आहे की अन्य कांही हेतू साध्य करावयचा आहे याचीच शंका यावी. गंमत म्हणजे ऐकणारांचे चेहरेही कमालीचे मख्ख असतात! त्यांनाही कदाचित अशिच भाषणे अपेक्षित असणार कारण ते ऐकायला आलेले नसतातच मुळी तर तो ऐकावयास बसविलेला "हक्काचा(!)" श्रोतागण असतो. "आडातच नाही तर पोह-यात कुठुन येणार!" अशीच गत झालेली. अशा सक्तिच्या स्मरणाने आदरभाव निर्माण होवू शकेल? राष्ट्रपुरूषांना खरी अदरांजली वाहिली जाईल? कदापिही नाही. त्यासाठी अंगी बाळगावी लागेल त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता, त्यासाठी करायला हवा त्यांच्या विचारांचा प्रसार कृतियुक्त सुयोग्य पद्धतिने. दुर्दैवाने अशे कार्यक्रम म्हणजे सुट्टीची परवणिच! कार्यक्रमाला शक्यतो फाटा कसा देता येईल, त्यासाठी पर्यायही शोधण्यामध्ये कांही मंडळी पटाईत असते! सुटीचा उपभोग मग ज्याच्या त्याच्या पद्धतिने ऐच्छिक असतो. या बाबतीत परदेशातील आदर्श आपण ऐकलेले असतात, अशा प्रसंगी घ्याव्या लागलेल्या सुट्टीएवढ्या कालवधीचा वेळ जादा काम करून भरून काढला जातो तिकडे मग म्हणावे वाटते कुठे ते आणि कुठे आपण! म्हणूनच शासनाला परिपत्रक काढायची वेळ यावी ही किती भुषणावह बाब आहे?  आज परिस्थिति एका भयानक वळणावर येवून पोहोचली आहे, राष्ट्राराष्ट्रात संघर्ष पेटला आहे! कुटुंबाकुटुंबात वाद निर्माण होउ लागला आहे! माणूस माणसापासून दुरावत चालला आहे! वृद्धआश्रमात लक्षणीय वाढ होताना दिसते आहे! "असुनी नाथ मी अनाथ!" अशाच जणू कांहीश्या स्थितीची नविनच विचित्र परंपरा रूढ होतेकी काय याची भिती वाटू लागली आहे! मग जिथे घरातील जेष्ठांचाच आदर डळमळीत झाला आहे…तिथे मग राष्ट्रपुरूषांप्रती आदराची आपेक्षा करणे म्हणजे कोरड्या विहरीतून पाण्याची अपेक्षा करण्यासारखेच होणार यात नवल कसले ? 
               म्हणून आपण सारेजन राष्ट्रपुरूष/थोर व्यक्तिंच्या जयंत्या तसेच राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करण्याबाबत सजगतापूर्वक आपले ते कर्तव्य आहे याची जाणीव ठेउया आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून ते निभवूया आणि सुट्टी मौजमजेत घालवण्यासाठी नसून राष्ट्रीय दिनाचे, थोरराष्ट्रपुरूषांचे औचित्यपूर्ण स्मरण, चिंतन करून त्यांच्या कार्याचे चिरंतन क्रतियुक्त पालन होईल यासाठी कटिबद्ध राहूया.