Thursday 4 September 2014

शिक्षक दिनानिमित्त.


शिक्षक दिनानिमित्त एक अनावृत्त पत्र



आदरणीय गुरूजी,       

आदरपूर्वक सप्रेम नमस्कार,


गुरूजी, ज्या ज्या वेळी मी शाळेला भेट देतो, त्या त्या वेळी मुख्याध्यापकाच्या दालनातील भिंतीवर लावलेल्या अब्राहम लिंकनच्या पत्राकडे माझं लक्ष आवर्जून वेधलं जातं. विद्यार्थ्याला सम्रद्ध, सुज्ञ, आत्मनिर्भर, कणखर व सुजाण नागरिक घडवण्याची विनंती केली आहे त्यांनी. ते पत्र भिंतीवर न रहाता विद्यार्थ्यांच्या ह्रदयावर कोरा. त्यांना खरा माणूस घडवा. मानवाच्या प्रमादामुळे भविष्यातील संकटाच्या नांदीचं एक भयावह दु:स्वप्न सृष्टीला पडत आहे.

या संकटाच्या खाईतून अखिल जीवसृष्टीला वाचवायचं असेल तर विद्य्यार्थ्याला शालेय शिक्षणातील विज्ञान तंत्रज्ञानासोबतच हेही शिकवावं लागेल की, माहिती तंत्रज्ञानामुळे अवघं विश्व कवेत सामावत चालंल आहे. परंतू आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतितील कांही त्रुटींमुळे तो स्वावलंबी बनण्याऐवजी परावलंबी बनतो आहे! पदवीधर असूनही स्वाभिमान गुंडाळून उदरनिर्वाहासाठी चहाची टपरी चालवन्यासारखी हलकी कामे करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे! बेरोजगाराचे जथ्थे रस्तोरस्ती फिरत आहेत. हाताला काम नाही मिळालं तर नाविलाजास्तव स्वत:, आणि कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारी प्रवत्तिकडे वळतो आहे! समाजक्षोभाला सामोरा जात स्वतःचा बळी देतोय! या सामाजिक संघर्षामध्ये त्याला जेता बणवायचं असेल तर त्याच्या क्षमता ओळखून, त्याचं कसब आणि कल ओळखून त्याच्या अंतरिक ऊर्जेला खतपाणी घालावे लागेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर उतरणारं व्यावसायिक कौशल्य त्याला शिकवावं लागेल. रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतन मध्ये हेच तंत्र अवलंबिले होते. अशा शिक्षणपद्धतिमुळे अकाशाला गवसणी घालणारे मोठमोठे कलावंत, चित्रकार, संगीतकार, साहित्यिक, नाटककार हे समाजात सामाजिक एकोपा नांदण्यासाठी पुरक ठरणारे घटक निर्माण होतील. निकोप समाजासाठी फक्त डॉक्टर आणि इंजीनियर पुरेसे नसतात हे पालकांच्या गळी उतरावयाला हवं! माणसामध्ये बळावत चाललेल्या स्वार्थलोलुपतेमुळे माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. त्यामुळे या सृष्टीचं अस्तित्वच पणाला लागलं आहे. जगाचं, अखिल जीवसृष्टीचं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर काही जाणीवा, भान हे जागृत ठेवावं लागेल. याची शिकवणही त्याला द्यावी लागेल.

 निसर्गाने मानवाला विपूल साधन संपत्तीचं भांडार खुलं करून खैरात केली आहे. पण ही साधन संपत्ती हिसकावून, ओरबाडून घ्यायचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे एवढंच तो शिकतो आहे. परिणामी सृष्टीचा घसा कोरडा पडतोय, जीव गुदमरतोय तिचा. तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे! पर्यावरणाचा -हास हे मानवा समोर उभारलेले सर्वात भयानक संकट आहे! बेसुमार जंगलतोड करून तो स्वत:च स्वतःच्या पायावर कुराड चालवत आहे! भौतिक सुवेधेच्या हव्यासापोटी कारखाने, मोटारीच्या माध्यमातून मानवाच्या नाकालाच कार्बनच धुराडं बनवलय! त्यामुळे अखिल मानवजातीचाच जीव गुदमरू लागला आहे! हे असंच चालंत राहिलं तर भविष्य अंधारात आहे. त्यासाठी पर्यावरण संतुलनाची पुस्तकी पोपटपंची शिकविण्यापेक्षा, सृष्टीच्या सानिध्यात जावून तिला गोंजारत तिचं रक्षण करणं, निसर्गाचा सन्मान करणं आपलं परमकर्तव्य आहे हेही शिकवावं लागेल.

आपण प्रभातसमयी राष्ट्रभक्तीचे 'जनगणमन', बंधुत्वाची 'प्रतिज्ञा', सदवर्तनाचा 'परिपाठ' घेता. तरीही राष्ट्रद्रोह मान वर करीतच आहे! जातीयता फोफावतच आहे! दुष्टप्रवृत्ती बळावत आहेत, म्हणून शब्दांच्या पलीकडील अर्थबोध त्यांना शिकवायलाच हवा. मर्यादांचे भान सुटत चालले आहे, रस्ता सुसाट बनलाय, अल्पवयातच तो दुर्व्यसनी बनत चालला आहे. एकतर्फी आंधळ्या प्रेमातून भररस्त्यावर विद्यालयाच्या पवित्र प्रांगणात दिवसाढवळ्या बलात्कार, खून, आत्महत्या होत आहेत! जन्म घेण्याआधीच स्त्री भ्रृणाचा गळा घोटला जातोय! प्रत्येक क्षेत्रात विसंवादाच्या अंधारात सुसंवाद हरवत चालला आहे. त्याच त्या चुकांची पुनरावृत्ती घडत आहे. म्हणून त्याला शिकवावा लागेल, आपल्या सम्रद्ध संस्कृतीचा वारसा, आत्मभान, सकारात्मक द्रष्टिकोण. आणि हेही जरूर शिकवा सन्मानाने जगा आणि इतरांनाही जगूद्याचा कानमंत्र, संयमाचं पालन, मर्यादाचे बांध आणखीन बरंच काही! त्यामुळे तो केवळ परिक्षार्थी नाहीतर खरा विद्यार्थी, एक माणूस घडेल.

गुरूजी, भविष्य घडवणं तुमच्याच हाती आहे. म्हणून त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत करून, सामाजिक बदलासाठी चार भिंतीच्या बाहेरच्या जगाबद्दल सहिष्णू व सृजनशील बनवा. गुरूजी, हे तुम्हीच करू शकता आणि ते कराच.

 जगदीश गिरी

     शांतिबन हरिराम नगर,

    बीड बायपास रोड, औरंगाबाद.