Thursday 17 October 2013

झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही ना..!!


झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही ना..!!




      श्रद्धेला डोळसपणे पहाण्याचा आग्रह अट्टहास धरणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोळकर नावाच्या श्रद्धेचातिमिरातून प्रकाशपर्वाकडे घेऊन जाणार्‍या सूर्योदयाच्या वेळीच खून व्हावा? आणि तोही सद्भावनेची शपथ घ्यावयाच्या सद्भावना दिवशी’? आणखी एक दुर्योग राखी पौर्णिमेचा रक्षा बंधनाचा’. ज्या दिवशी महाराष्ट्रच नव्हे तर अवघा भारत देश बहिणीच्या रक्षणाचा बहिणीला विश्वास देतोय त्या दिवसाचा. श्रद्धाही मानवी जीवनास प्रेरणादायी जिवो जीवस्य जीवनमची शिकवण देणारी एक शक्‍ती आहे आणि या शक्तीच्या बळावर त्यांच आयुष्य, जीवन हे खर्‍या अर्थाने मानवीठरतं.  हीच श्रद्धा जर जीवनातून वजा केली, तर उरत ते पशुत्व. डॉ. नरेंद्र दाभोळकरही श्रद्धेच्या विरोधात कधीच नव्हते. त्यांचा आग्रह एवढाच होता की, श्रद्धा जरूर बाळगा पण डोळस होऊन.  पुजा, सण, उत्सव जरूर साजरे करा पण ते मानवी जीवनास पूरक ठरणारे असावेत याची काळजी घ्या. या उत्सवामुळे पर्यावरण मग ते ध्‍वनी, जल, वायु इ. द्वारे बिघडून मानवी आरोग्यास धोका ठरू नये. तुमच्या ज्या श्रद्धा आहेत, विश्वास आहे तो निर्विकल्प, निरीछ आणि विवेकी असावा. मग तो समाज रचनेस पूरक आणि साधक ठरेल. अंधश्रद्धा ज्या माणसांना कंगाल करून सोडतात, त्यांना जीवनातून उठवतात, त्यांना बळी जावू नका. श्रद्धेच्या पाठीमागचं विज्ञान ओळखायला हवं. मग कुणाच्या भजनी लागावच लागणार नाही. जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार म्हणून घेतो तिथच अराजकतेची बीज रुजतात. त्याची पाळंमूळं खोल जाऊन त्याचा विषवृक्ष इतका फोफावतो की, तो उपटणं अशक्यप्राय होऊन जातं. विवेक सुटून स्वार्थ लोलुपता वाढीस लागते, ही स्वार्थ लोलुपता इतकी कल्पक असते की, तिने समाजमनाचा पुरेपूर अभ्यास केलेला असतो, तिला माहित असतं दुनिया झुकती है”. दुर्दैवानं ही दुनिया सुद्धा स्वतःची बुध्दी गहाण ठेऊन झुकणारीच असते. म्हणूनच ती अंधश्रद्धेला बळी जाते.



      श्रद्धेला कुणीही ही नाकारलेलं नाही आणि नाकारू ही नये. परंतु, मुकी बिचारे कुणीही हाकाही प्रवृती श्रद्धेला डोळसपणे पाहू देत नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकर हा डोळसपणा जागवण्यासाठी अविरत झटत होते. हा डोळसपणा जागवणार्‍यांचा त्यांच्या इतकाच इतिहास फार मोठा आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लांनिर्भवतीची शिकवण देण्यापासून पुरातन आहे. या ग्लांनीतून समाजाला जागे करण्यासाठी प्राण पणाला लाऊन लढा देणार्‍या फार पुरातन काळातील इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही. समाज सुधारणेसाठी लोकहितवादी पासून फुले, शाहू, आंबेडकर, बाबा आमटे ते थेट दाभोळकरा पर्यंत शब्दशः प्राणपणाला लाऊन लढा दिला आहे. संत कबीरांपासून ते ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास ते थेट गाडगेबाबा पर्यंत संतांच्या मांदियाळीने श्रद्धेला जपत अंधश्रद्धेवर घाव घालण्यासाठी स्वतःवर घाव झेलले आहेत. घाव झेलता झेलता कित्येकांचे बलिदानही गेलेले आहे. परंतु, दैवदुर्विलास असा की, हा बळी ज्या ज्या वेळी जातो त्या त्या वेळी कुंभाकर्णाला जाग आल्याप्रमाणे तात्कालिक सभा, मोर्चे, लढा उस्फुर्तपणे उभारला जातो. निषेध, घोषणा देत अंगुलीनिर्देश करत विरोध प्रदर्शित केला जातो. पण लक्षात घेतलं जात नाही की, एक बोट जेव्हा आपण दुसर्‍याकडे दाखवतो त्या वेळी चार बोटे आपल्याकडे ही असतातच ना!

      आजही तेच घडतय. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येसाठी आम्ही जबाबदार धरतोय सरकार, पोलिस यंत्रणा, सामाजिक/धार्मिक संघटनांना. ज्याच्या त्याच्या मर्यादा ठरलेल्या असतात त्यांना त्यांच्या विचारसारणी प्रमाणे, कार्यपद्धतीप्रमाणे काम करणे भाग पडते. नव्हे ते त्यांचे कर्तव्य असते. हे खरे असले तरी याचेही भान असायला हवे की, आपण कोणाच्या तरी दबावाखाली आपल्या कर्तव्यात कसूर करतोय का? डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या पोलीस स्टेशन परिसरात होते, हत्येपुर्वीचे व नंतरचेही सीसीटीव्‍ही चे फुटेज उपलब्ध आहेत. पोलीस पथके ही कार्यरत आहेत तरीही तपासासाठी अक्षम्य विलंब का व्हावा? आपली ख्याती आहे की, आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा शोध लावून त्यांना शिक्षा ही देवू शकतो. मग दाभोळकरांच्या हत्या-याच्या तपासकामी एवढा विलंब का व कशासाठी? हा सामान्य जनतेसमोर प्रश्न उभा ठाकल्यास नवल का वाटावे? विज्ञान, तंत्रज्ञांनामुळे अवघं जग मुठीत आलय याचा दावा आपण मोठ्या गर्वाने करतोय! हा दावा कितपत खरा आहे? याचं आत्मपरिक्षण करण्याची वेळ आज येऊन ठेपलीय. सभा, निषेध, मोर्चे जरूर काढावेत ते समाजाच्या जिवंतपणाच द्योतक आहे. परंतु, हा जिवंतपणा, जागृतपणा क्षणीक आणि फसवा ठरू नये! दुसर्‍याला चिमटे काढत कालापव्यय करण्यापेक्षा जरा स्वतःलाच चिमटा काढूया की, आपण स्वतः कितपत जागृत आहोत? कितपत डोळस आहोत? हा जागृतपणाचा, डोळसपणाचा धडा घेतला तरच आपला हा लढा जीवंत ठरेल. नाही तर पुन्हा कुंभकर्णाप्रमाणे पुढील दुर्दैवी घटना घडेपर्यंत झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल!  

       डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर एक आशादायी चित्र निश्चित दिसून येत आहे. या चळवळीकडे सत्यशोधक व सकारात्मक दृष्टीने कार्यकर्ते सहभागी होत आहेत. या सह्भागाला कृतिशिलतेची जोड मिळाल्यास चळवळ निश्चितच यशस्वी होईल आणि ती तितक्याच नेटाने पुढे जाईल.


   

Sunday 13 October 2013

आर्त हाक अनामिकेची


आर्त हाक अनामिकेची


"आई, अगं आई, ए आई, ऐक ना गं आई. अगं मी तुझ्या पोटचा, तुझ्या रक्ता-मांसाचा गोळा बोलतेय गं ! तुला ते का ऐकू येत नाही ? कुठल्या गहन विचारात हरवून गेलीयस आई तू? अगं मी तुझी अनामिका बोलतेय. अगं माझे अजून डोळेही उमलले नाहीत, कानही फुटले नाहीत आणि तोंडात जीभही अजून सुटलेली नाही. म्हणुनच की काय माझा आवाज तुझ्या कानापर्यंत पोहचत नाही. पण आई तुझी ही तंद्री तुटू दे गं अणि माझे अबोल बोल तुझ्या कानी पडू दे गं. अगं मी माझ्या अजून तुला न दिसणाऱ्या कानांनी ऐकलंय, अजून न उमललेल्या डोळ्यानी पाहिलंय, जेव्हा तू बोहल्यावर, कपाळावर बाशिंग बांधून, मुंडावळ्या बांधून चढली होतीस तेंव्हा तू किती किती सुंदर दिसत होतीस गं. त्याच मी वर्णनही करू शकत नाही गं. त्या वेळेस तुझं मन किती मोहरुन गेलं होतं, तू अगदी मुग्ध झाली होतीस. भावी संसाराची गोड गोड आणि सुंदर स्वप्न रंगवत अपल्यातच हरवून गेली होतीस. तुझं मन, तुझं अवघं विश्व त्या वेळी स्वप्नाळलं होतं, "माझ्या संसारवेलीवर छान छान साजिरी गोजिरी फुलं फुलावित माझ्या उबदार कुशीत, प्रेमच्या मायेने ती उम्लावीत, असंच स्वप्न तू पाहत होतीस न गं आई.


आई बाबाच्या लाडाकोडात वाढलेली माहेरवाशीण तू आज सासूरवाशीण झाली होतीस. तुझी पाठवणी करतेवेळेस तुला आठवतंय, लग्नसमारंभासाठी आनंदात फुलून गेलेला, थट्टामस्करीत बहरून आलेला मांडव आता अचानक गलबलून गेला होता. स्फुंदूस्फुंदून रडत होता गं. कारण आता या घरची लाडकी त्या घरची झाली होती. तळ हाताच्या फोडापरी आजवर सांभाळलेलं लेकरु आज परकं झालं होतं. रोज नजरे पुढे बागडनारं, अंगाखांद्यावर खेळनारं, बघता बघता छ्कुलीचं रूपडं नवरी मुलीत झालं अन आज ते नजरेआड होणार होतं. आईच्या काळजात हलकल्लोळ माजला होता. धरणीकंप व्हावा तसं ती गदगदून थरथरत होती, आक्रोशत होती.ताई दूर जाताना भॆय्याच्या हृदयी तूफानी वादळ घोंगावत होतं, कधी लुटूपूटीचं तर कधी खरं झालेलं भांडण आठवत स्फुंदत होतं. काळजाच्या घडाला जड अंत:करणानं निरोप देताना पित्याच्या काळजात सागरी कल्लोळ माजला होता. तुला निरोप देतांना सर्वांची समजूत घालीत होतं. आपल्या व्याह्याला विहीणबाईला अन जवायाला पण, माझ्या काळजाचा घड तुमच्या हाती देतोय त्याला नीट जपा हो. म्हणून विनवीत होते. आवं ढे गिळत होते, डोळ्यात फुटू पाहणाऱ्या बांधाला आता मनसोक्त वाहू देत होतं. का? असं का होतं? कारण तू आई, त्यांची मुलगी होतीस, भैयाची ताई होतीस, घरादाराची लाडकी छकुली होतीस, मैत्रीणींची तू सखी होतीस, कोणाशी कोणतं का नातं असेना तू एक मुलगी होतीस "मुलगी." तुला तुझ्या आई बाबांनी जन्म दिला. किती भाग्यवान आहेस गं तू आई.


सासरी आल्यावर आपल्या नवऱ्याची तू लाडकी राणी झालीस. आपली वंशवेल वाढवणार म्हणून तू सासू सासऱ्यांची सून झालीस. घर कसं आनंदात बागडू लागलं. तुला कुठं ठेवू कुठं नकोअसे सर्वानां झाले. लहानगा दीर तर वहिनी वहिनी म्हणून तुझ्या भोवतालीच बागडायचा. तू आईची माया देवू लागलीस तुझ्याशिवाय त्याचं पानही हलेना. "त्यांच्या" त्या प्रेमामुळे तूही अगदी मोहरून गेलीस, उमललीस, फुललीस आणि एकेदिवशी तुला अनामिक जाणीव झाली आणि हे गुपीत तू लाजत मुरकत हळूच माझ्या होणाऱ्या बाबांच्या कानात सांगितलंस अन् बाबा जमिनीवरून उडालाच. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की स्वर्ग जणू त्याला दोन बोटेच उरला होता. तो उड्या मारायचाच बाकी होता. त्याही मारल्या असत्या गं पण आता तो मोठा झाला होता ना. त्याला आता ते शोभलं नसतं. मी तुम्हा दोघांना काय अन् कसं सांगू मला वाटलं होतं, माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेचा, तुम्हाला आनंद होतोय. माझा भाबडा जीव सुखावून गेला गं.


तुझी अन् तुझ्या उदरी अंकुरणाऱ्या बिजाची, संसारवेलीवर उमलणाऱ्या कळीची काळजी घेण्यासाठी अवघं घर राबू लागलं. दवाखाण्यात नियमित तपासण्या सुरू झाल्या. डॉक्टरही निरनिराळ्या चाचण्या घेऊ लागले. औषधोपचारसुरू झाले. माझी वाढ चांगली व्हावी, तुझ्या उदरातील अंकुराचा विकास निर्धोक व्हावा म्हणून ते तुम्हाला वैद्यकीय सल्ला देऊ लागले. माझाही हळूहळू विकास होऊ लागला. अंकुर आकार घेऊ लागला. अन् एक विपरीत घडू लागलं. तुझ्या नवऱ्याच्या, माझ्या होणाऱ्या बाबाच्या अपेक्षेने एक वेगळीच दिशा पकडली. डॉक्टर नकार देत असतांना गर्भजल चाचणीचा अट्टहास त्याने मांडला.अगं आई मला अजून नखही नाही अन् शिखही फुटलेले नाही गं. तरीही मी तुमच्या भाषेत नखशिखांत शहारले गं, पण डॉक्टरचा नकार मला दिलासा देत होता, मी निश्चिंत होत होते. अजून मन काय असतं याची जाणीवही नसलेल्या माझ्या मनानं परमेश्वराचे आभार मानले गं. डॉक्टर हे ईश्वराचेच रूप असतात, ते मारत नाहीत तर तारतात यावर माझा विश्वास बसूलागला होता. पण आई तुझ्या नवऱ्यानं, होय तुझ्या नवऱ्यानंच म्हणेन मी त्याला, तो माझ्या जीवावर उठलाय गं. मी माझा बाबा कसं म्हणू त्याला तूच सांग? त्यानं त्या डॉक्टरला काय आमिष दाखवलं ते त्या दोघांनाच माहित. डॉक्टरने तुझ्या नवऱ्याच्या हातात रिपोर्ट दिला की होणारं बाळ हे मुलगी आहे "मुलगी." तुझ्या नवऱ्याचा उत्सुकतेनं फुललेला चेहरा अचानक काळवंडला, उदासला अन् सुकून गेला बघ. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, वात्सल्य हे झरझर मावळतांना मला दिसू लागलं, तो उदास झाला. आता त्या चेहऱ्यावर मला दोन शिंग फुटलेला, केसाळ चेहऱ्यावर लांब लांब दात असलेला क्रुरपणे खदखद हसणारा राक्षस दिसू लागला. त्यानं जो निर्णय घेतला तो ऐकून मी अत्यंत भयभीत झाले. वाटू लागलं की, माझ्या लुसलुसणाऱ्या कोवळ्या कोवळ्या देहावर तुझ्या रक्तामांसावर वाढू पहाणाऱ्या पोटच्या गोळ्यावर जणू सहस्त्र विजेचे लोळ आग ओकत आहेत, राक्षसी हास्याचा गडगडाट करत, एकदाच कोसळत आहेत. त्या कोवळ्या, मासूम, निरपराध, निष्पाप जिवाला अक्षरश: भाजून त्याची राखरांगोळी करतायत,असे चित्रविचित्र भास होऊ लागले आई. आई,आई गं,त्याच्या वेदना किती आणि कशा होतील, त्या तो कोवळा देह कसा सहन करील? सांग ना आई. अगं त्या डॉक्टरची कात्री माझ्या जिवाला लागेल गं, माझा एक एक अवयव निर्दयपणे कापून काढील तो, त्याची हातोडी कठोरपणे माझ्या डोक्यावर पडेल आणि ते नारळ फुटल्यासारखं फुटून अंगाअंगातून रक्त भळभळेल, त्या रक्ताचे पाट वाहू लागतील गं. त्यावेळी मला वेदना होणार नाहीत, कारण माझा देह ते सहन करण्याच्याही पलीकडे गेला असेल. पण आई तुला वेदना होणार नाहीत काय गं? खरं सांग ना, अतीव वेदनांनी तुला ही मूर्च्छा येईल.


आई तूही एक स्त्री आहेस, तुझ्या आईच्या उदरात तू मुलगी म्हणुनच जन्म घेतलास. किती आनंद झाला तुझ्या आई-बाबांना तुला आठवत नसेल कदाचित पण मला आठवतय "पहिली बेटी तूप रोटी", "पहिली बेटी धन की पेटी" म्हणून सगळ्या गावाला जिलेबी वाटून आपणही आनंदी झाले. साऱ्या गावाला आनंदात सहभागी करून घेतले. किती कोडकौतुक झाले तुझं. खरंच तू भाग्यवान आहेस आई. मीही तुझ्यासारखी भाग्यवान का होऊ नये गं? तुझ्या नवऱ्याचा निर्णय तुलाही नक्कीच आवडणार नाही आणि आवडलेला नाही हे मला माहिती आहे आई. अगं जगात अशी एकही आई शोधून सापडणार नाही गं जिने आपल्या स्वखुशीने, मर्जीने आपल्या उदरात वाढणाऱ्या, ज्याला अजून गळाही निर्माण झाला नाही, त्याचा गळा दाबावा! त्याच्या नरडीचा घोट घ्यावा!! अशी भावना होईल? कदापिही शक्य नाही आई. तू दुर्बल होऊ नकोस आई, तू अबला नाहीस, तू एक शक्ती आहेस. तुझ्यात सामर्थ्य आहे महिषासुरमर्दिनीचं, कलकत्तेवालीचं, तुझ्यातलं सामर्थ्य तू ओळख आई. अशी तू हतबल होऊ नकोस. अगतिक होऊ नकोस. ठणकावून सांग त्या नराधमांना, श्रष्टीची उत्पत्ती या शक्तिच्याच उदरी झाली आहे. शक्तीशिवाय उत्पत्ती नाही हा निसर्गनियम आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाहीआणि जर का कोणी यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत सेल तर वंशवेल वाढण्याचे स्वप्न पहाणं तर सोडाच ती वंशवेल मुळापासूनच उपटून जाईल, जीवनचक्र ठप्प होईल याची जाणीव करून देण्याची शक्ती तुझ्यात आहे, याची जाण आणि भान तुला येऊ दे. निकरानं लढा दे. कडाडून विरोध कर अन् माझी बाजू घे, मी स्त्रीभ्रूण, तू स्त्री, तू माझी बाजू घेणार नाहीस तर कोण घेईल गं? 


आई तुझ्यासारखंच भाग्यवान व्हायचंय मला. जग किती सुंदर आहे, ते किती प्रेमळ आहे, किती लाघवी आहे ते पहायचय मला. आई तुझी छकुली व्हायचंय, बाबांची लाडकी व्हायचय, आजी-आजोबांची दुधावरची साय व्हायचंय, दादाची लाडकी ताई व्हायचय. सगळी सगळी मला निभवायचीत गं मला. तुझी माया, बाबांची छाया, दादाचं प्रेम याचा मला स्वर्गीय आनंद घ्यायचाय गं. आजी-आजोबांच्या मांडीवर झोपून, झोप लागेपर्यंत छान छान गोष्टी ऐकायच्यात. माझ्या सख्यांसोबत मला बागडायचय. बागडत बागडत मोठं व्हायचंय, एवढं मोठं व्हायचंय की, मला तुझी अन् बाबांची पण आई व्हायचय गं आई. तुमच्या वृद्धापकाळाची काठी व्हायचंय गं मला. मग सांग तुमच्या होणाऱ्या आईला तुम्ही पोटातंच मारणार? स्त्रीभ्रूणहत्त्या करणार? एवढं मोठं पातक तुमच्या माथी तुम्ही मारून घेणार? नाही असं नाही करायचं, आपल्या बाळाचं ऐकायचं!"


"खरंच तू ऐकलंस आई, अन् बाबांच मत परिवर्तन करण्यात तू यशस्वी झालीस आणि मला या सुंदर जगात येण्याची तू संधी दिलीस, तू आईपणाला जागलीस, बाबांना मोठ्या पातकापासून वाचवलंस. तू महान कार्य केलस, वंशवेल पूढे चालवण्याचं मोठं कार्य!! बघ ना आई जे बाबा मला पोटातच नाकारत होते, तेच बाबा आज मला हाताचा पाळणा करून माझा गोड गोड पापा घेतायंत गं!"


                                                                                                                        आनंदयात्री या पुस्तकातून