Sunday 26 July 2015

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने.

गुरबिनु भवनिधि तरइ न कोई।
जो बिरंचि संकर सम होई॥

हिंदू संस्कृती मध्ये अगदी वेद, उपनिषद, गिता, पौराणिक ग्रंथामधून गुरू विषयीचा एक आदरभाव दिसून येतो. संसार सागरातून तारून नेणारी देवापेक्षाही महत्वपूर्ण असणारी मार्गदर्शक व्यक्ती असल्याची तुलसीदासांच्या रामचरितमानस मधील पदरचनेतूनही स्पष्ट होते. गुरू शिवाय संसार सागरातून कोणीही तरून जावू शकत नाही हा गुरु शंकरा समानच अर्थात परमेश्वररूप असतो हे तुलसीदासांनी फार प्रभावीपणे गुरूमहात्म्य विषद केले आहे.

परवा एक नाथपंथी दारावर येवून भजन गावू लागला, त्याने गायलेले हे भजन अजूनही मनात रुंजी घालतय...

बीन घन बीजली चमके रे
क्या मौज बड़ी गुरू घर की ॥धृ.॥

लाल गुंडेला सूरज झरके
झर लागे कंचन की॥

त्रीकुट धार चढकर जांवा
गगनमण्डल पर झलकी॥

गुरू घरची मजा कांही औरच आहे, तीथे ढग नसतांनाही वीज चमकते! अर्थात या गुरूघरात सतत ज्ञानरूप प्रकाशाच्या वीजेचा लखलखाट होत असतो! लाल गुंडेला सूरज अर्थात अज्ञानरूप अंधाराकडून ज्ञानरूप तेजाकडे हा प्रवास गुरूच्या कृपेने घडत असतो! तीथे मग मनातली आसक्ति नाहिशी होते आणि मृतिकाही सोने भासू लागते! इथे निष्पृहतेची शिकवन मिळते आणि धन लालसे पोटी होणारं मनातलं अराजक शांत होते!
संत कबीरदासांनी तर परमेश्वरापेक्षाही गुरूभक्ति श्रेष्ठ मानली आहे, ते म्हणतात...

गुरु गोविंद दोऊं खड़े काके लागू पाय
बलीहारी गुरु अपने गोविंद दियो बताय॥

जो गुरु परमेश्वराचं खरं रूप दाखवून देतो त्याच्यावरच मी समर्पित होईन! गुरू हा ज्ञानी असेल तरच तो शिष्यांना सन्मार्गी लावेल अन्यथा अज्ञानी गुरूच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे गुरु आणि शिष्य दोघांचाही कपाळमोक्ष ठरलेला म्हणून संत कबीरांनी अशा अज्ञानी गुरु पासून चार हात दूरच राहायला सांगीतले आहे! अज्ञान गुरूच्या संगतीने दोघांचंही अहीत ठरलेलं...

जाका गुरु अंधा चेला खरा निरंध
अंधा-अंधा ठेलिया, दुन्यूं कूप पडत॥

जगदीश गिरी