Thursday 17 October 2013

झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही ना..!!


झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही ना..!!




      श्रद्धेला डोळसपणे पहाण्याचा आग्रह अट्टहास धरणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोळकर नावाच्या श्रद्धेचातिमिरातून प्रकाशपर्वाकडे घेऊन जाणार्‍या सूर्योदयाच्या वेळीच खून व्हावा? आणि तोही सद्भावनेची शपथ घ्यावयाच्या सद्भावना दिवशी’? आणखी एक दुर्योग राखी पौर्णिमेचा रक्षा बंधनाचा’. ज्या दिवशी महाराष्ट्रच नव्हे तर अवघा भारत देश बहिणीच्या रक्षणाचा बहिणीला विश्वास देतोय त्या दिवसाचा. श्रद्धाही मानवी जीवनास प्रेरणादायी जिवो जीवस्य जीवनमची शिकवण देणारी एक शक्‍ती आहे आणि या शक्तीच्या बळावर त्यांच आयुष्य, जीवन हे खर्‍या अर्थाने मानवीठरतं.  हीच श्रद्धा जर जीवनातून वजा केली, तर उरत ते पशुत्व. डॉ. नरेंद्र दाभोळकरही श्रद्धेच्या विरोधात कधीच नव्हते. त्यांचा आग्रह एवढाच होता की, श्रद्धा जरूर बाळगा पण डोळस होऊन.  पुजा, सण, उत्सव जरूर साजरे करा पण ते मानवी जीवनास पूरक ठरणारे असावेत याची काळजी घ्या. या उत्सवामुळे पर्यावरण मग ते ध्‍वनी, जल, वायु इ. द्वारे बिघडून मानवी आरोग्यास धोका ठरू नये. तुमच्या ज्या श्रद्धा आहेत, विश्वास आहे तो निर्विकल्प, निरीछ आणि विवेकी असावा. मग तो समाज रचनेस पूरक आणि साधक ठरेल. अंधश्रद्धा ज्या माणसांना कंगाल करून सोडतात, त्यांना जीवनातून उठवतात, त्यांना बळी जावू नका. श्रद्धेच्या पाठीमागचं विज्ञान ओळखायला हवं. मग कुणाच्या भजनी लागावच लागणार नाही. जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार म्हणून घेतो तिथच अराजकतेची बीज रुजतात. त्याची पाळंमूळं खोल जाऊन त्याचा विषवृक्ष इतका फोफावतो की, तो उपटणं अशक्यप्राय होऊन जातं. विवेक सुटून स्वार्थ लोलुपता वाढीस लागते, ही स्वार्थ लोलुपता इतकी कल्पक असते की, तिने समाजमनाचा पुरेपूर अभ्यास केलेला असतो, तिला माहित असतं दुनिया झुकती है”. दुर्दैवानं ही दुनिया सुद्धा स्वतःची बुध्दी गहाण ठेऊन झुकणारीच असते. म्हणूनच ती अंधश्रद्धेला बळी जाते.



      श्रद्धेला कुणीही ही नाकारलेलं नाही आणि नाकारू ही नये. परंतु, मुकी बिचारे कुणीही हाकाही प्रवृती श्रद्धेला डोळसपणे पाहू देत नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकर हा डोळसपणा जागवण्यासाठी अविरत झटत होते. हा डोळसपणा जागवणार्‍यांचा त्यांच्या इतकाच इतिहास फार मोठा आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लांनिर्भवतीची शिकवण देण्यापासून पुरातन आहे. या ग्लांनीतून समाजाला जागे करण्यासाठी प्राण पणाला लाऊन लढा देणार्‍या फार पुरातन काळातील इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही. समाज सुधारणेसाठी लोकहितवादी पासून फुले, शाहू, आंबेडकर, बाबा आमटे ते थेट दाभोळकरा पर्यंत शब्दशः प्राणपणाला लाऊन लढा दिला आहे. संत कबीरांपासून ते ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास ते थेट गाडगेबाबा पर्यंत संतांच्या मांदियाळीने श्रद्धेला जपत अंधश्रद्धेवर घाव घालण्यासाठी स्वतःवर घाव झेलले आहेत. घाव झेलता झेलता कित्येकांचे बलिदानही गेलेले आहे. परंतु, दैवदुर्विलास असा की, हा बळी ज्या ज्या वेळी जातो त्या त्या वेळी कुंभाकर्णाला जाग आल्याप्रमाणे तात्कालिक सभा, मोर्चे, लढा उस्फुर्तपणे उभारला जातो. निषेध, घोषणा देत अंगुलीनिर्देश करत विरोध प्रदर्शित केला जातो. पण लक्षात घेतलं जात नाही की, एक बोट जेव्हा आपण दुसर्‍याकडे दाखवतो त्या वेळी चार बोटे आपल्याकडे ही असतातच ना!

      आजही तेच घडतय. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येसाठी आम्ही जबाबदार धरतोय सरकार, पोलिस यंत्रणा, सामाजिक/धार्मिक संघटनांना. ज्याच्या त्याच्या मर्यादा ठरलेल्या असतात त्यांना त्यांच्या विचारसारणी प्रमाणे, कार्यपद्धतीप्रमाणे काम करणे भाग पडते. नव्हे ते त्यांचे कर्तव्य असते. हे खरे असले तरी याचेही भान असायला हवे की, आपण कोणाच्या तरी दबावाखाली आपल्या कर्तव्यात कसूर करतोय का? डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या पोलीस स्टेशन परिसरात होते, हत्येपुर्वीचे व नंतरचेही सीसीटीव्‍ही चे फुटेज उपलब्ध आहेत. पोलीस पथके ही कार्यरत आहेत तरीही तपासासाठी अक्षम्य विलंब का व्हावा? आपली ख्याती आहे की, आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा शोध लावून त्यांना शिक्षा ही देवू शकतो. मग दाभोळकरांच्या हत्या-याच्या तपासकामी एवढा विलंब का व कशासाठी? हा सामान्य जनतेसमोर प्रश्न उभा ठाकल्यास नवल का वाटावे? विज्ञान, तंत्रज्ञांनामुळे अवघं जग मुठीत आलय याचा दावा आपण मोठ्या गर्वाने करतोय! हा दावा कितपत खरा आहे? याचं आत्मपरिक्षण करण्याची वेळ आज येऊन ठेपलीय. सभा, निषेध, मोर्चे जरूर काढावेत ते समाजाच्या जिवंतपणाच द्योतक आहे. परंतु, हा जिवंतपणा, जागृतपणा क्षणीक आणि फसवा ठरू नये! दुसर्‍याला चिमटे काढत कालापव्यय करण्यापेक्षा जरा स्वतःलाच चिमटा काढूया की, आपण स्वतः कितपत जागृत आहोत? कितपत डोळस आहोत? हा जागृतपणाचा, डोळसपणाचा धडा घेतला तरच आपला हा लढा जीवंत ठरेल. नाही तर पुन्हा कुंभकर्णाप्रमाणे पुढील दुर्दैवी घटना घडेपर्यंत झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल!  

       डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर एक आशादायी चित्र निश्चित दिसून येत आहे. या चळवळीकडे सत्यशोधक व सकारात्मक दृष्टीने कार्यकर्ते सहभागी होत आहेत. या सह्भागाला कृतिशिलतेची जोड मिळाल्यास चळवळ निश्चितच यशस्वी होईल आणि ती तितक्याच नेटाने पुढे जाईल.


   

No comments:

Post a Comment