Sunday 5 May 2019

भूतदया

रात्रीचा आडीच वाजण्याचा सुमार, रात्र काळोखी,  निभीड अंधकाराची चादर धरित्रीवर  पांघरलेली, श्रष्टी निद्रेच्या अधीन झालेली, आम्हीही गाढ झोपेत. अचानक किंकाळण्याचा आवाज कानावर पडू लागला! जणू कांही कुणीतरी रडत भेकत आर्त सूरात मदतीसाठी साद घालतंय असं वाटू लागलं! झोप उडाली, उठून बसलो आणि आवाजाचा वेध घेवू लागलो, माझ्या अगोदरच माझी भाच्ची पद्मश्री उठून दरवाजा उघडत होती, झोपेतच तीला कुणीतरी बाहेर न जाण्याची सूचना करत होते परंतू काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आवाजामुळे ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती! दरवाजा उघडून ती वेगाने आवाजाच्या दिशेने एक व्याकूळ हरणी आपल्या पाडसाच्या काळजीने सुसाट धावून जाते तशीच तिची गत!

माझ्याही डोळ्यावरची झोप उडाली बैटरी घेऊन  तिच्या मागे धावलो. पद्मश्रीला पूर्वानुभवे आवाजाचा वेध निश्चित आला होता, गल्लीतल्या नालीच्या दिशेने ती अंधाराची तमा न बाळगता जात होती, बैटरीचा प्रकाशझोत टाकत तीच्या पाठोपाठ मीही नालीच्यादिशेन धावलो. चोहीकडे गुडुप अंधार पसरलेला, आकाशातील चांदण्यांच्या मंद प्रकाशात पद्मश्री नालीजवळ पोहचताच एक कुत्री तीच्या दिशेने भूंकत आली, मीतर घाबरूनच गेलो वाटलं आता ही कुत्री पद्मश्रीचे लचके तोडणार, मी ओरडुन तीला मागे फिरायला सांगत होतो पण झालं विपरीतंच, पद्मश्री जवळ येताच कुत्री शेपटी हालवत, कुंई कुंई विव्हळंत तिच्या भोवती गोलाकार घिरट्या घालू लागली, नालीतून कुत्रीच्या नवजात पीलांचा विव्हळण्याचा आवाज येत होता!

पद्मश्री नाल्यावर ओणवी झाली आणि नालीच्या घाणेरड्या पाण्यात हात घालून एक एक करत तीनही पीलांना बाहेर काढले. पीले घाणीने भरलेल्या अंगांनी कुंई कुईं करत पद्मश्रीच्या पायावर कृतज्ञतेने लोळन घेऊ लागली. पीलांची आई आनखीही पद्मश्रीच्या भोवती शेपटी


हलवत घीरट्या घालत होती परंतू तीच्या आवाजातली अगतिकता नाहिशी झाली होती आणि जणू ती कृतज्ञभावाचं प्रदर्शन करत तीचे आभार मानत होती. समोरच्याच एका घराच्या बंद गेटमधून एक महिला शीव्यांची लाखोली वहात होती! कारण पीलांच्या ओरडण्यामुळे तीची झोपमोड झाली होती!

जीवाच्या अकांताने ओरडनारी पीले, त्यांच्या आईची अगतीकता, पद्मश्रीचा भूतदयेचा भाव आणि झोपमोडीमुळे महिलेची शीव्यांची लाखोली! खरोखरच हा इवलासा प्रसंग मानवी स्वभाव, प्रवृत्तीचे किती चपखलपणे वर्णन, विश्लेषण करतो बघा...

विव्हळण्याच्या आवाजाने पद्मश्रीच्या जीवाची घालमेल, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपण कोणाची मदत करतोय, मदत केल्यावर आपला काय फायदा होईल का, या विचारांंनी मनाला यत्किंचीतही स्पर्श केला नाही. एवढाच विचार मनात की कोणीतरी संकटात सापडलेले आहे. त्याला संकटातून वाचवण्यासाठी आपण धावून गेलंच पाहिजे आणि ते माझे कर्तव्यच आहे. एवढाच विचार करून धावत जाणे, यालाच भूतदया म्हणतात. ती पद्मश्रीच्या मनात भिनलेली. अशी माणुसकी जपणारी माणसं आपल्या अवतीभवती असतात म्हणूनच आपम निश्चितपणे, विश्वासाने आणि निर्धास्तपणे जगत असतो.


पद्मश्रीला धोका पत्करू नको म्हणून आपल्याच कोषात गुरफटून गेलेली, फक्त आपण स्वतः सुरक्षित जगणे स्विकारणारी माणसे दुसऱ्याच्या मदतीला काय धावून जाणार! मात्र स्वत:वर संकट कोसळले तर अवघ्या जगाने आपली मदत केली पाहिजे अशी त्यांची धारणा मात्र पक्की असते. 


पद्मश्रीने धोका पत्करलाय हे लक्षात येताच आपणही मदतीला गेले पाक्षहिजे अशी सहकार्याची स्वाभाविक भावना बाळगणारेही याच समाजात वावरताना दिसतात. म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्यांंनाही पाठबळ मीळते आणि उत्साहाने ते परत संकटात सापडणाऱ्यांच्या मदतीला धावून जातात.


कुत्री आणि तीची पीले मदतीला आलेल्या व्यक्तीप्रती कृतज्ञता बाळगून असतात.


आणि कोणाचा जीव जात असेल तर आम्हाला त्याचं काय देणे घेणे, आम्हाला मात्र कोणाची झळ नाही पोचली पाहिजे. काय म्हणावे अशा वृत्तीला. बेफिकीर, आपमतलबी की आणखी काही! याची मी तरी वर्गवारी करू शकत नाही.




No comments:

Post a Comment