Saturday 9 November 2013

नेणीवांची पानगळ ते जाणिवांची पालव

    मध्यमवर्ग ....
नेणीवांची पानगळ ते जाणिवांची पालव

"अवघे विश्वची माझे घर
ऐसी मती जयाची स्थीर
किंबहूना चराचर
आपण जाहला."

सतरा वर्षाच्या कोवळ्या वयाने तेराव्या शतकात दिलेले हे  "अध्यात्मिक जागतिकीकरण"....आणि आज एकविसाव्या शतकात एका सतरा वर्षाच्या पोराने सत्तर वर्षाच्या बापाला घराबाहेर काढून दाखवलेलं "स्वार्थाचं भौतिकीकरण" मध्यमवर्गियाच्या सुखवस्तू "चौकटीचे" खांब उध्वस्त करतोय....!!
"भावार्थदीपिकेचं" "स्वार्थदीपीकेत" होणारं अवतरण थांबवणारा ज्ञानेश्वर व्हायची किंमत आपण मोजू शकतो का?? वेळीच याचं उत्तर शोधलं नाही, तर येणारा काळ असंख्य प्रश्न उभा करेल.... म्हणून तर हा विचार प्रपंच...
             "वसुधैव कुटुम्बकम" ही हिन्दू धर्माची शिकवण, वसुधेवर असणाऱ्या अखिल जीवमात्राशी नातं जोडायला सांगनारी. किती उदात्त भावना ओतप्रोत भरलेली आहे या संकल्पने मध्ये. यामुळेच तर हिन्दू संस्कृती जगभरात वंदनीय ठरली आहे. परंतू मध्यंतरीच्या काळामध्ये परकियांची भारतवर्षावर अतिक्रमणे होत राहिली, परकियांची संस्कृती आणि मुळ संस्कृतीमध्ये  देवाणघेवाण होणे अपेक्षित होते. ज्यामुळे संस्कृती अनखिन सम्रद्ध व्हायला चालना, मदतच झाली असती...पण तसं न होता संस्कृति संस्कृतीमध्ये संघर्ष होऊ लागला! धार्मिकतेमधे इर्षा, कट्टरवाद बोकाळंत गेला..! अन् मानुसंच मानसाचा शत्रू बनत गेला! भौतिकवाद, चंगळवादाचं रान फोफावत गेलं. अर्थातच स्वार्थ हा प्रत्येकाच्या मानगुटीवर बसला तर नवल कसलं मानायचं..! या स्वार्थाच्या राक्षसाने जगाला काबीज केलं ! देश देशाचा शत्रू बनला, राष्ट्राराष्ट्रांत संघर्ष सुरू झाले. ते लोन अगदी घरापर्यंत पोहचायला वेळ लागला नाही! आपसांत कलह सुरू झाले. कांही परिहार्य कांही अपरिहार्य कारणामुळे एकत्र कुटुंबे विभागली गेली. कुटुंब हे पतीपत्नी आणि मुलं असं त्रीकोणी वा चौकोनी आकार घेत गेलं. आता या कुटुंबात जेष्ठांचं स्थान डळमळीत होत चाललय. ही अत्यंत चिंतेची बाब बनत चाललीय. अर्थार्जनासाठी उरफुटेपर्यंत धावपळ चालली आहे. या धावपळीत कुटुंबातील जीवाला जीव देणारी आपली मानसं दुरावली जात आहेत, आपणंच आपल्यांना परकं करतोय याचं भानही रहात नाही. आपल्या पश्चात बाळाला प्रेमाची उब देणारी, त्यांच्या जिज्ञासाची भुक भागवनारी अनुभवी जाणकार मंडळी दूर जात आहेत. बाळाचा हात धरून त्याला पोटाशी धरंत त्याचं संगोपन करायला आपल्याला वेळ नसतो! मग बाळाचा  आपल्या हातातून हात केंव्हा सुटून ते दूर जातो हे कळंतही नाही. कळते तेंव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते! नसुधारण्या पलीकडे.
      कौटुंबिक स्तरांवर ही स्थिती तसेच सामाजिक स्तरावर ही वेगळेपण नसते. "व्यष्टी तशी समष्टी" हा जणू अलिखीत नियमच आहे! समाजातील असे कितीतरी प्रश्न आपल्या पुढे आ वासून उभे आहेत. अज्ञान, दारिद्रय यामुळे दीनदलीतांच्या गरजांची ससेहोलपट होत असते. पण हेच अज्ञान,दारिद्रय (वैचारिकही) कांही स्वार्थी, संधीसाधू लोकांसाठी फायद्याचे, उपयोगाचे असते गरजुंना आपल्या दावणीला बांधलं आणि एकदाका त्यांना दावणीची सवय झाली की ते बांधले काय किंवा मोकळे सोडले काय ते फिरून फिरून गोठ्यात दावणीला येणारंच याची खात्री या संधी साधूंना असतेच. या व्रत्ती मुळेच विना सायास सुख, चैन,आराम याची लयलूट करता येते. जाणीव पुर्वक पर्यावरणाचे असंतुलन, आर्थिक लाचारी त्यामुळे होणारा विद्रोह, बंडखोरी, लांडीलबाडी, दरोडेखोर व्रत्ती याकडे डोळेझाक केली जाते. मग त्याचा परिपाक अन्याय, अत्याचार अराजकता  यांना  खतपाणी  घालण्यात होतो.आणि हे अन्याय अत्याचाराचे अस्त्र बुमरँग प्रमाने उलटुन आमच्यावरच घाव घालंत असते.आम्ही स्वतःला खुप सुज्ञ, जाणकार, उच्चविद्या विभूषित, धनाने, गुणाने संप्पन्न समजत असतो. त्यामुळे इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत ही भावना मनात कायम घर करून बसलेली, त्यामुळेच की काय सुरवंटाने स्वत:ला कोषात गुंतवून घेतल्या सारखे आपण भले आपले विश्व भले म्हणून घरात कोंडुन घेतलेले! ना कोणासी संपर्क ना कोणासी जवळीक. एक गमतीदार उदाहरण ऐकलेले आठवते, एका सेमीनारमध्ये दोन सहभागींची ओळख होते, सेमिनार आटोपून दोघे परतीच्या प्रवासाला निघतात, रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा शोधत असतांना दोघांना कळते की दोघेही एकाच रेल्वे स्टेशनला जाणार असतात, तिकीट काऊंटरवर समजते की दोघेही एकाच शहराकडे जात आहेत.स्टेशन वर उतरल्यावर घराकडे जाण्यासाठी एकाच रिक्षा मध्ये बसतात. रिक्षातून एकाच  वसाहती जवळ उतरतात, दोघांनाही अश्चर्य वाटते. ते एकमेकांना विचारतात, "अरेच्चा तुम्हीपण इकडेच रहाता काय, कोणत्या इमारती मध्ये?" एकाच अपार्टमेन्ट मध्ये दोघे रहात असतात, अपार्टमेंट मध्ये पोहचल्यावर घरांचे नंबर विचारतात तेंव्हा कळतं की ते तर एकमेकांचे शेजारीच असतात!! अशी स्वतः भोवती एक अद्रश्य कुंपण घालून घेतलेले आम्ही लोक! केवळ आपल्या अन आपल्या कुटूंबाचा उत्कर्ष यातंच गुरफटून घेतलेले.खरा उत्कर्ष काय आहे याची परिभाषा न कळालेले! पैसा मानमरातबासाठी धावत सुटलेले! धावतांना जीवघेण्या स्पध्रेत उतरलेले!! धावताना यांचे लक्ष जमिनीकडे नसतेच मुळी.आकाशाकडे पहात जेंव्हा धावनं(?) चालू असतं तेंव्हा पायाखालची वाळू हळूहळू सरकत चाललेली तेंव्हा कळत पण नसते. या धावण्याच्या शर्यतीत होते दुर्लक्ष पोटच्या लेकरांकडे, सोन्यासारख्या कुटुम्बीयांकडे, त्यावेळी कळंत असतं पण वळंत नसतं! जेंव्हा कळतं तेंव्हा फार फार उशीर झालेला असतो! पायाखालची वाळू सरकलेली असते, आकाशापर्यंत हातही पोहचत नसतात.समुद्रामध्ये गटांगळ्या खाव्या लागतात तेंव्हा पदरी निराशा येते! आपले कुणाला म्हणावे तर त्यांना आपणच दूर सारलेले असते. आपली मुलंही त्यावेळी दुरावलेली असतात! कारण ज्यावेळी त्यांना पाहिजे असते मायेची उबजिज्ञासांची उकल नेमके त्यावळी पैसा, प्रतिष्ठेच्या म्रगजळापाठीमागे धावत असतो उर फुटेपर्यंत, परंतू म्रगजळ तर हाती सापडंत नाहीच. उर मात्र फुटून जातो! "तेल गेलं तुप गेलं हाती धुपाटणं आलं." अशी गत होउन जाते. मुलं आजच्या दुनियादारी मध्ये गुरफटत गेलेली असतात तुमचं ऐकायचं तर सोडाच तुम्हालाच ते वेडे ठरवतात! वेड्यासारखं धावतांना परिणामाची जाणीव आम्हाला राहिलेली नसते. कारण त्यावेळी डोळ्यावर पट्टी  बांधलेली असते गांधारी सारखी वेड्या प्रेमाची! फसव्या प्रतिष्ठेची परंतु जेंव्हा डोळ्यावरची पट्टी निघते तेंव्हा अवतीभवती संहार द्रष्टिपथात दिसतो आणि पसरलेला असतो अंधार चहूकडे. पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. त्या अंधारात हरवलेली असतात आपली माणसे आपली संतती. होतो मग भ्रमनिरास! भ्रमाचा भोपळा फुटतो पण तो भोपळाही कांही कामाचा नाही उरंत! मग खापर फोडलं जातं दैवाच्या माथ्यावर सोइस्करपणे!!
       पण दैव दैव म्हणजे तरी काय असतं, आपण हरलेल्या परिस्थितीत आपलं मन देखील हरू नये आणि पुढचे सर्वच मार्ग खुंटले जावू नयेत, बंदही होवू नयेत म्हणून आपणास दिलासा मिळावा, आपण परत उभारी घ्यावी अन्  फिनिक्स प्रमाणे परत त्या अंधारात हरवलेल्या  प्रकाशवाटा शोधायला बळ मिळावं  म्हणून आपल्या संस्क्रुतिने दिलेली ती शिकवन आहे. म्हणून परिस्थिती समोर हार न मानता परिस्थिती ओळखून तिचा मुकाबला करायला शिकलं की परिस्थिती आपली गुलाम बनते! मात्र परिस्थितिला शरण जायचं की परिस्थितिवर मात करायची हे मात्र ज्याच्या त्याच्या हातातच असतं.

No comments:

Post a Comment