Wednesday 13 November 2013

सद्विवेक


सद्विवेक

सूखाचे सर्व सोबती... सगेसोयरे नातीगोती..!

दु:ख मात्र असुदे तुझे एकट्याचेच सांगाती..!!

 

        जिवनात आलेल्या आनंदाच्या, सुखाच्या क्षणात माणूस इतरांना सहजपणे सहभागी करून घेतो, इतरांच्या आनंदात तितक्याच समरसतेने सामील ही होऊ शकतो. परंतु वेदना, दु:खात मात्र स्वतः च्या वेदना, स्वत:चं दु:ख तो आतल्या आत लपवण्याचा, दडवण्याचा प्रयत्न करीत असतो. मानवी स्वभावाच्या सहजप्रव्रत्तितून येणाऱ्या अनुभूति, वेदना या संवेदनशील मानसाला आतून कुठेतरी हलवत असतात. त्या त्याला अस्वस्थ करून सोडतात. हीच अस्वस्थता त्याची झोप मोड  करत असते. जशी प्रथ्वीच्या उदरात अशीच अस्वस्थतता सतत खळबळत असते.! कधीतरी ती उत्पात बनंत लाव्हारसाच्या रूपानं आतून धक्के देत ज्वालामुखीचं उग्र रूप धारण करंत बाहेर  पडत असते... त्यावेळी होणारी थरथर, विनाश हा आपला प्रताप कांही काळ का होत नाही दाखवत असतो. परंतू विश्वाच्या अमर्याद आयुष्यात तो काळ अगदीच नगण्य असतो. कालांतराने परत प्रथ्वीवरचं जीवनचक्र पूर्ववत अखंडपणे फिरायला लागतं. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो, हिरवळ फुटत असते आणि मग ती अपल्याच मस्तीत मदमस्तपणे लहरत लहरत परिसराला आपल्याकडे आकर्षित करते, त्याला प्रसन्नता बहाल करत असते. तशाच मानवी जीवनातील वेदना, दु:ख हे क्षणिक, तत्कालीक असते. मात्र ते पचवायची क्षमता आंगी बाणायला शिकलं पाहिजे.

            या वेदना, दु:खात माणूस इतरांना सहभागी करून घेवू इच्छित नाही, एकाकीपणे आतल्या आत घुसमटत असतो, अंतरी आक्रंदत जगनं हे निरर्थक वाटायला लागतं. परंतू त्याला एक नैसर्गिक देनगी मिळालीय ती प्रतिभेची. प्रतिभेच्या माध्यमातून तो प्रकट होत असतो, साहित्यातल्या कुठल्या न कुठल्या रूपातून. या साहित्याची  उत्पत्तिच  वेदनेतून  झाली आहे असं मानलं जातं. क्रौंचवधाच्या वेदनेतूनच पहिलं काव्य अवतरीत झालं आहे! म्हणूनच पु. ल. नी म्हटलं आहे जगण्यासाठी काय करायचं हे कुणिही शिकवू शकेल, पण "कशासाठी जगायचं" हे फक्त साहित्यच शिकवू शकेल. या वेदना माणसाची तत्कालीक का होत नाही झोप उडवतात हे निश्चित. जीवनमुल्यांना कुठनाकुठं ठेस पोहचली की तो आतुन हादरतो, अस्वस्थ होतो. परंतु मानसाला सद्सदविवेकबुद्धी हा गूण त्या निसर्गानंच बहाल केला आहे. या सद्सदविवेकबुद्धिने तो सत्यासत्याचा, भल्याबु-याचा, बरोबरचुकीचा परामर्श घेऊ शकतो आणि असत्त्यावर सत्त्याचा, बू-यावर भल्याचा मार्ग त्याला सापडंत असतोच असतो. मग त्याची अस्वस्थता कुठल्या कुठे नाहिशी होते. असेच कांही प्रसंग मानसाच्या आयुष्यात येत असतात. अशा प्रसंगाने झोप निश्चित चाळवली जाते, जिवनमुल्ये संभ्रमित होतात. मानसाच्या मनात पुरता गोंधळ उडतो, तो अस्वस्थ होतो, सारासार विचारही कुंठित होतो. अशावेळी अनर्थकारी परिणामही कदाचित घडण्याची भिती उद्भवू शकते. या संदर्भात "जगा... पण सन्मानानं!" या पुस्तकातून शिव खेरा यांनी दिलेले लेखापालाचे ऊदाहरण फार समर्पक आहे. त्यांनी ते सुंदररित्या आपल्या पुस्तकात उद्धृत केलं आहे. तो लेखापाल निष्प्रह, सदवर्तनी, जीवनमुल्ये जपत काम करणारा. त्याला एकदा त्याच्या सद्सदविवेकबुद्धिला न पटना-या कामाविषयी आमिष दाखवत विचारना केली गेली, त्याच्यावर सद्सदविवेकबुद्धिचा प्रभाव असल्यामुळे ते काम स्विकारण्यास त्याने तत्काळ होकार दिला नाही. तरीही आमिषाच्या लोभाला बळी पडत विचार करण्यासाठी अवधी मागितला. आपल्या तत्वापासून तो विचलित झाला, त्याच्या मनाचा अस्वस्थतेने ताबा घेतला ... आणि ते आमिष त्याचा पाठलाग करीत घरापर्यंत पोहोचले! त्याने त्याची झोप चाळवली, रोजच्याप्रमाने आईच्या हातचे जेवन करून आंथरूणावर पडला पण आता झोप कुठल्याकुठे पळाली होती. प्रलोभनाचा अविचार आणि सद्सद विवेकबुद्धिचं द्वंद्व त्याच्या अंतरमनात जुंपलं होतं! अस्वस्थता वाढत होती, झोप पुरती चाळवली गेली होती! उशीर पर्यंत त्याच्या खोलीत दिव्याचा प्रकाश पाहून त्याची अशिक्षित(?) आई खोलीत आली. आईची चाहूल लागताच तो उठला आणि तथाकथित रूढ अर्थाने अशिक्षित आईला त्याने  परिस्थिती समजावत सल्ला विचारला, " आई मी काय करावं असं तुला वाटतं?" त्या मातेचं उत्तर त्याच्या डोळ्यात अंजन घालनारं होतं, "आरं बाबा मला काय कळतंयरं या तुमच्या येव्हारातलं. पण मला आडानीला येवडंच कळतं बग, ज्या कामामुळं झोपमोड व्हत आसंल ते काम करावंच कशाला? मला तू हमेशा सारखाच शांत चित्तानं झोपल्याला बघायचंय!" बस्स त्या संभ्रमित लेखापालाला उत्तर मिळाले, तो जे समजायला हवं होतं ते समजला. जे तत्वज्ञान पुस्तकातून, मोठमोठ्या धर्मग्रंथातून, प्रकांड पंडिताकडून मिळायला, शिकायला त्याला उभं आयुष्यही कमी पडलं असतं ते तत्वज्ञान त्याला त्या अशिक्षित ठरवल्या गेलेल्या त्याच्या  आईकडून  एका वाक्यातून उमगलं होतं! कारण ते समजायला त्याची सद्सदविवेकबुद्धि जाग्रत होती...  हेही तितकंच खरं.

       आपल्या आयुष्यातही लेखापालाच्या आयुष्यात, एका टप्प्यावर आलेला प्रसंग या ना त्या रुपांत येत असतोच. मानवी स्वभाव हा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षड्रिपुंनी ओतप्रोत भरलेला असतो. या शत्रूं पैकी एक जरी शत्रू आपल्या मनावर हावी झाला, मनाच्या मानगुटीवर बसला तर होत्याचं नव्हतं व्हायलां कांहींच वेळ लागत नाही! होत्याची परिस्थिति निर्माण व्हायला अनेक तपं घालवावी लागतात! जशी विश्वनिर्मितीसाठी युगेनीयुगे जात असतात तशी. पण विनाशाला, प्रलयाला क्षणाचाही काळ पुरेसा असतो. निर्माणाला फार दिव्यातून, कष्टातून, यातनेतून जावं लागतं म्हणूनच हे निर्माण हळुवार जपायला हवं. हे निर्माण जपण्यासाठी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, समर्पण, आदरभाव इत्यादि गुणांची आवश्यकता असते. या गुणांमुळेच नातीगोती, गोतावळा टिकवण्यासाठी मदत होत असते. नात्यांमधे ओलावा टिकवून धरला जात असतो. तो ओलावा जपता आला पाहिजे, नाही जपता आला तर सुपिक जमीन कोरड्या रखरखीत माळरानात रूपांतरित होउन जाते, या माळरानाला सावली देणारे व्रक्षही खुरटले जातात! ते खुरटलेपण कसल्याच सावलीच्या कामाचं रहात नाही. मग हे माळरान आपल्याला खायला उठते... पाय होरपळून जातात! अंगाला उन्हाचे चटके असह्य होतात! तद्वत जीवन नकोसं वाटायला लागतं!

          निसर्गाने जसे षड्रिपू निर्माण केलेले आहेत तशेच त्यांच्यावर मात करण्यासाठी अस्त्रेही बहाल केलेली आहेत मानवाला जन्मासोबतंच. षड्रिपुच्या अस्त्रांची होळी करण्यासाठी सर्व धर्मांनी आपापल्या धर्मग्रंथांमधे कांहीं समसमान तत्वांची शिकवण दिली आहे, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मश्चर्य, अपरिग्रहः हीच ती अमोघ अस्त्रे. पंचशील नावाने ती ओळखली जातात, हे पंचशील आपले शिल जपायला, ते व्रधिंगत करायला शिकवतं. जीवन सम्रद्ध करायला, त्यात आनंदपर्व निर्माण करायला ही आयुधं शिकवतात. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, समर्पण, आदरभाव या गुणांनी ती पाजळायला, हाती पेलायला शिकलं पाहिजे. या अस्त्रा मध्ये फार मोठी शक्ति आहे. अगदी पर्वताला पाझर फोडण्या इतपत प्रबल... पण ती आज बोथटताहेत स्वार्थलोलूपतेमुळे, त्यावर गंज चडतोय आपमतलबी व्रत्तिच्या आंधळेपणाचा! आज घणघोर युद्ध मांडलय या आसूरीव्रत्तिनं!! या प्रव्रत्ति अशाच बळावंत राहिल्या, फोफावत राहिल्या तर समाजातले विखुरलेपण आणि विरळपण वाढत जावून विनाश अटळ ठरतो. म्हणून हे विखुरलेपण आनखीन विखुरले जावू नये, ते सांधलं गेलं पाहिजे. ते सांधायला मात्र आपणंच सुरूवात करायला हवी. याची जाणीव तर सर्वांना असते पण......

 

कळतं पण वळंत नसतं, म्हणूनच जग दु:खी असतं...

उसवत्याला जो टाके घालतो, त्याचंच जगनं जगनं असतं..!

 

         शेवटी रूसो म्हणतोना, " खरं स्वातंत्र्य म्हणजे कांही प्रमाणात सद्सदविवेकाने स्वत:वर घालून घेतलेली बंधने.... तेंव्हा या सद्सदविवेकालाच जीवनाची सावली करून आयुष्याची पालवी पुन्हा पुन्हा बहरत ठेवू."

No comments:

Post a Comment